मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे आणि हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू खेळीमुळे मुंबईनं कोलकात्याचा १३ रननी पराभव केला. या विजयाबरोबरच मुंबईनं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय व्हायचं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या मुंबईनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १८१ रन केल्या आहेत. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे मुंबईला एवढ्या रनपर्यंत मजल मारता आली. यादवनं ३९ बॉलमध्ये ५९ रनची खेळी केली. यामध्ये ७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. यादवबरोबर ओपनिंगला आलेल्या एव्हिन लुईसनं २८ बॉलमध्ये ४३ रन केले. लुईसनं ५ फोर आणि २ सिक्स लगावल्या. यादव आणि लुईसमध्ये ९१ रनची पार्टनरशीप झाली. यानंतर बॅटिंगला आलेल्या रोहित शर्माला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा ११ रनवर आऊट झाला. मुंबईनं या मोसमात जिंकलेल्या तिन्ही मॅचमध्ये रोहितचा स्कोअर २० रनपेक्षा जास्त होता. हार्दिक पांड्यानं २० बॉलमध्ये नाबाद ३५ रन केले. कोलकात्याकडून सुनिल नारायण आणि आंद्रे रसेलनं प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
मुंबईनं ठेवलेल्या १८२ रनचा पाठलाग करताना कोलकात्यानं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १६८ रन केल्या. कोलकात्याकडून रॉबिन उथ्थपानं ३५ बॉलमध्ये सर्वाधिक ५४ रन केल्या. उथ्थपाच्या खेळीमध्ये ६ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. तर कोलकात्याचा कर्णधार आणि विकेट कीपर दिनेश कार्तिकनं २६ बॉलमध्ये नाबाद ३६ रन केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं ४ ओव्हरमध्ये फक्त १९ रन देऊन २ विकेट घेतल्या. मॅकलेनघन, बुमराह, कृणाल पांड्या आणि मयंक मार्कंडेनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
या मॅचमध्ये रॉबिन उथ्थपा आणि नितीश राणानं तिसऱ्या विकेटसाठी ९१ रनची पार्टनरशीप केली. या दोघांची पार्टनरशीप सुरू असताना कोलकात्याची टीम मजबूत स्थितीमध्ये दिसत होती. पण या दोघांची विकेट गेल्यावर मुंबईनं पुनरागमन केलं. ज्या पद्धतीनं रॉबिन आणि नितीश खेळत होते त्यांच्यापैकी एकानं जास्त वेळ बॅटिंग करायची गरज होती पण खराब शॉट खेळून त्यांनी विकेट गमावली. यामुळे रन बनवण्याची गती प्रभावित झाली, असं कार्तिक म्हणाला. सुनिल नारायणला बरं वाटत नसल्यामुळे त्याला सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवल्याचं वक्तव्य दिनेश कार्तिकनं केलं.
कोलकात्याविरुद्धच्या विजयानंतरही आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई पाचव्या क्रमांकावर कायम आहे. मुंबईनं खेळलेल्या १० मॅचपैकी ४ मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तर ६ मॅचमध्ये पराभवाचं तोंड पाहायला लागलं. मुंबईकडे सध्या ८ पॉईंट्स आहेत. तर कोलकात्याची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकात्यानं १०पैकी ५ मॅच जिंकल्या तर ५ मॅच हरल्या. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याकडे १० पॉईंट्स आहेत.