मुंबई : एकीकडे धोनीच्या टी-20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच धोनी त्याच्या नव्या इनिंगला दुबईतून सुरुवात करत आहे. शनिवारी धोनी दुबईमध्ये त्याच्या क्रिकेट अॅकेडमीचं उद्घाटन करणार आहे. या अॅकेडमीसाठी धोनीनं दुबईतल्या पॅसिफिक व्हेन्चर्ससोबत पार्टनरशीप केली आहे. दुबईतल्या स्प्रिंगडेल्स स्कूल कॅम्पसमध्ये ही अॅकेडमी उभारण्यात आली आहे.
क्रिकेट हा आता फक्त खेळ राहिलेला नाही तर यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतोय तर अनेकांच्या व्यवसायाचं क्रिकेट हे साधन झालं आहे. या क्लबचा हिस्सा होण्यासाठी मी उत्साही आहे. या अॅकेडमीच्या यशासाठी मी माझं सगळं योगदान देईन, असं वक्तव्य धोनीनं केलं आहे.
एम.एस.धोनी क्रिकेट अॅकेडमी (एमएसडीसीए) असं या अॅकेडमीचं नाव असेल. तसंच धोनी हाच या अॅकेडमीचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असेल. अॅकेडमीमधल्या मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी धोनी ठराविक कालावधीनंतर दुबईलाही जाणार आहे.
दुबईमध्ये ही अॅकेडमी सुरु झाल्यामुळे यूएईच्या क्रिकेटला याचा फायदा होईल, असा विश्वास पॅसिफिक व्हेन्चर्सचे डायरेक्टर परवेझ खान यांनी व्यक्त केला आहे.
याआधी हरभजन सिंग, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही क्रिकेट अॅकेडमी सुरु केल्या होत्या. पण या सगळ्यांच्या क्रिकेट अॅकेडमी भारतामध्येच आहेत. धोनी हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे जो परदेशामध्ये क्रिकेट अॅकेडमी सुरु करणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धची टी-20 सीरिज भारतानं २-१नं जिंकली पण, राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20नंतर धोनीवर टीकेची झोड उठली होती. बड्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोहली मोठे शॉट्स मारत होता पण धोनीला जलद रन्स बनवता आल्या नाहीत. यानंतर लक्ष्मण आणि आगरकरनं धोनीच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले. तर सेहवाग आणि गावस्कर यांनी मात्र धोनीची पाठराखण केली.