मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताच्या दारुण पराभवाचं आता विश्लेषण व्हायला सुरुवात झाली आहे. गांगुली आणि लक्ष्मण या खेळाडूंनी कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयांवर आक्षेप घेतला आहे. लोकेश राहुलला टीममधून वगळल्यामुळे गांगुली आणि लक्ष्मणनं विराटवर टीका केली. आता भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं धोनवीर निशाणा साधला आहे. धोनीच्या संथ बॅटिंगमुळे त्याच्यासोबत खेळणाऱ्या बॅट्समनवरचा दबाव वाढत असल्याचं गंभीर म्हणाला.
तिसऱ्या वनडेमध्ये धोनीनं ६६ बॉल खेळून ४२ रन केले. यामध्ये ४ फोरचा समावेश होता. धोनी बॅटिंगला आला तेव्हा २५ ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर १२५ रनवर ३ विकेट होता. त्यावेळी कर्णधार विराट कोहली धोनीसोबत मैदानात होता.
दुसऱ्या वनडेमध्येही धोनीनं संथ खेळी केली. ३२३ रनचा पाठलाग करताना धोनी २७ व्या ओव्हरला बॅटिंगला आला तेव्हा भारताचा स्कोअर १४० रन होता. त्यावेळी सुरेश रैना धोनीसोबत खेळत होता. या मॅचमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रन केले. यामध्ये २ फोरचा समावेश होता.
याआधी धोनी एवढे डॉट बॉल खेळायचा नाही. यावर धोनीला काम करायची गरज आहे. धोनी सध्या फॉर्ममध्ये नाही. धोनी आधी खेळपट्टीवर वेळ घेतो आणि नंतर फटकेबाजी करायला सुरुवात करतो. पण सध्या असं होत नाहीये. तुम्ही वेळ घेणार असाल तर तुम्हाला शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकलं पाहिजे, असं वक्तव्य गंभीरनं केलं. गौतम गंभीरनं अनेकवर्ष धोनी कर्णधार असताना बॅटिंग केली आहे. धोनी कर्णधार असताना गंभीरही कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार होता.