सचिनमुळं 'या' खेळाडूला BCCIने फटकारलं; पहिल्यांदाच समोर आली माहिती

त्यांना काही नवे प्रयोग करायचे होते

Updated: Jun 10, 2020, 01:54 PM IST
सचिनमुळं 'या' खेळाडूला BCCIने फटकारलं; पहिल्यांदाच समोर आली माहिती  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : क्रिकेट विश्वात अतिशय कमी वयात सुरुवात करत आपल्या दमदार खेळीच्या बळावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीविषयी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. सुरुवातीच्या काळात भारतीय संघाकडून मधल्या फळीत फलंदाजीसाठी येणाऱ्या सचिनचा खरा खेळ पाहायला मिळाला तो म्हणजे जेव्हा त्याला सलामीवीर म्हणून मैदानात पाठवण्यात आलं.

किंबहुना फलंदाजीच्या याच क्रमामुळं सचिनला मैदानात जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची आणि खेळपट्टी गाजवण्याची संधी मिळाली. १८ हजारहून अधिक धावा करत या सलामीवीरानं नव्या पिढीसाठी अनेक विक्रम प्रस्थापित केले. सलामीवीर म्हणून सचिनचा जम बसला. त्याला याच स्थानावर फलंदाजी पाठवण्याठीच्या अट्टहासापोटी एकदा भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद असणाऱ्या मोहम्मद अझहरुद्दीनला बीसीसीआयच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

बांग्लादेशसोबतच्या सामन्याच्या वेळी घडलेला हा किस्सा 

एका संकेतस्थळाशी फेसबुक लाईव्हमध्ये संवाद साधतेवेळी अझहरुद्दीननं याबाबता खुलासा केला. याचविषयी सांगत तो म्हणाला, '१९९८ मध्ये भारतीय संघ बांग्लादेशमध्ये खेळणार होता. निवड समितीकडून सलामीच्या जोडीसाठी काही नव्या कल्पना सुचवण्यात आल्या होत्या. त्यांना काही नवे प्रयोग करायचे होते. त्यांनी मला त्यावेळी सचिनला फलंदाजीसाठी चौथ्या स्थानावर आणण्यास सांगितलं. या स्थानावर येत त्यानं ८० धावा केल्या. पण, सचिन सलामीवीर म्हणूनच योग्य असल्याचं मला वाटत होतं. ज्यामुळं मी त्याला पुन्हा त्याच स्थानावर बोलवलं. या निर्णयासाठी भारतात परतल्यानंतर मला BCCI बीसीसीआयनं चांगलंच फटकारलं होतं'. 

 

वाडेकर यांच्या सहमतीनं सचिनला मिळालेलं सलामीवीराचं स्थान

हा आपल्या कारकिर्दीतील अधिक महत्त्वाचा निर्णय़ असल्याचं सांग अझहरुद्दीन म्हणाला, 'मधल्या फळीमध्ये सचिनला त्याची प्रतिभा दाखवता येत नसल्याचं मला प्रकर्षानं जाणवलं. चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर तो आक्रमक खेळी खेळायचा खरा. पण, क्षेत्ररक्षणासाठी काही प्रतितबंध नसल्यामुळं अवघ्या ३०-४० धावा करणंच त्याला शक्य होत होतं'. याचदरम्यान, न्यूझीलंड दौऱ्यात नवज्योत सिंग सिद्दू दुखापतग्रस्त झाला आणि सचिनला सलामीवीराच्या स्थानी बोलवण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यावेळशी संघाचे व्यवस्थापक असणाऱ्या अजित वाडेकर यांच्या अनुमतीनं, त्यांच्या सांगण्यावरुन सचिनला सलामीसाठी बोलवण्याचा निर्णय झाला आणि अर्थातच हा निर्णय़ फायद्याचाही ठरल्याचं त्यानं सांगितलं.