बांगलादेश क्रिकेटचे अध्यक्ष देश सोडून पळाले, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' तीन देशांचा पर्याय?

Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये राजकीय अराजकता पसरली आहे. बांगलादेशमध्ये दोन महिन्यांनी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. 

राजीव कासले | Updated: Aug 9, 2024, 05:20 PM IST
बांगलादेश क्रिकेटचे अध्यक्ष देश सोडून पळाले, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' तीन देशांचा पर्याय? title=

Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे. देशात राजकीय अराजकता माजली असून संतप्त जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे. आरक्षणाच्या नावाखाली ठिकठिकाणी लूट सुरु आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Haseena) यांनी पदावरुन पाय उतार होत देशाबाहेर पलायन केलं आहे. या दरम्यान दोन महिन्यांनी बांगलादेशमध्ये (Bangladesh) महिला टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं (Womens T20 World Cup 2024) आयोजन केलं जाणार आहे. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा होणार असून यात 10 संघ सहभागी होणार आहे. 18 दिवसांच्या कालावधीत एकूण 23 सामने खेळले जाणार आहेत. पण बांगलादेशमधली सध्याची परिस्थिती पाहाता या स्पर्धेवर रद् होण्याचं सावट पसरलं आहे. 

बांगलादेश क्रिकेटचे अध्यक्ष देश सोडून पळाले
देशातील हिंसक परिस्थितीमुळे बागंलादेश क्रिकेट बोर्डाच्या (Bangladesh Cricket Board) अध्यक्षांसहित मोठे अधिकारी देश सोडून पळाले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आंतराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड दुसऱ्या पर्यायांवर विचार करत आहेत. या दरम्यान बांगलादेशमध्येच महिला टी20 वर्ल्ड कप व्हावा यासाठी सैन्याची मदत घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. 

बीसीबीचं बांगलादेश सैन्याला चिठ्ठी
आरक्षणाच्या मुद्दावर बांगलादेशमध्ये राजकीय सत्तापालट झालंय. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केलंय. तर त्यांच्या समर्थकांनाही देशातून बाहेर काझलं जात आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, संचालक आणि अनेक मोठे अधिकारी देश सोडून गेलेत. क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीचे समर्थक होते अशी माहिती आहे. 

बांगलादेशमध्ये सध्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महिला टी20 वर्ल्ड कप खेळवणं कठिण बनलंय. अशा परिस्थितीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमान यांना पत्र लिहिलं लिहून या स्पर्धेसाटी सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. अंपायर कमिटीचे अध्यक्ष इफ्तिकार अहमद मिठू यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट बोर्डाचे अनेक सदस्य देश सोडून गेलेत. त्यामुळे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सेनेची मदत मागितल्याचं  इफ्तिकार अहमद यांनी म्हटलंय. 

आयसीसीने मागितली सुरक्षेची हमी
बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डात सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती इफ्तिकार अहमद यांनी दिलीय. आयसीसीने बीसीबीकडे खेळाडूंच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. सुरक्षा पुरवणं हे क्रिकेट बोर्डाचं काम नसल्याचंही इफ्तिकार अहमद यांनी म्हटलंय. त्यामुळे आयसीसीने बांगलादेश लष्कर प्रमुखांना सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे. यावर 10 तारखेपर्यंत उत्तर मागवण्यात आलं आहे. बांगलादेश आर्मीच्या उत्तरानंतर बांगलादेशमध्ये महिला टी20 वर्ल्ड कप खेळवायचा की नाही याबाबत आयसीसी निर्णय घेणार आहे. 

या दरम्यान आयसीसी इतर कोणत्या देशात स्पर्धा खेळवता येईल या पर्यायांचा शोध घेत आहे. यात भारत, श्रीलेका आणि युएई या देशाचा समावेश आहे. बांगलादेशमधली राजकीय परिस्थिती बदलली नाही तर या तीन देशांपैकी एका देशात महिला टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x