टी20 वर्ल्ड कपआधी मोठा उलटफेर, अमेरिकेने 'या' बलाढ्य संघाचा केला पराभव, टीम इंडियाला इशारा

USA vs BAN: टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता काी दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 2 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. यासाठी सर्व20 संघ सज्ज झालेत. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक मोठा उलटफेर झाला आहे.

राजीव कासले | Updated: May 22, 2024, 05:40 PM IST
टी20 वर्ल्ड कपआधी मोठा उलटफेर, अमेरिकेने 'या' बलाढ्य संघाचा केला पराभव, टीम इंडियाला इशारा title=

USA vs BAN: टी20 वर्ल्ड कप 2024 ला येत्या 2 जूनपासून सुरुवात होईल. वेस्टइंडिज आणि अमेरिका या स्पर्धेचे यजमान आहेत. या स्पर्धेत तब्बल 20 संघांनी सहभाग घेतला असून सर्व संघ सज्ज झालेत. यादरम्यान आयर्लंडने (Ireland) पाकिस्तानचा (Pakistan) पराभव करत खळबळ उडवून दिली होती. आता आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. यावेळी अमेरिका क्रिकेट संघाने (USA) बलाढ्या बांगलादेशचा (Bangladesh) पराभव करत इतिहास रचला आहे. टी20 वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेश आणि अमेरिकेत तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अमेरिकेने बांगलादेशचा 5 विकटेने लाजीरवाणा पराभव केला.

यूएसएची दमदार कामगिरी
तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यूएसएने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अमेरिकेच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशची टॉप ऑर्डर सपेशल फ्लॉप ठरली. 50 धावातच बांगलादेशने तीन प्रमुख फलंदाज गमावले. बांगलादेशच्या तौहिदने अर्धशतक झळकावलं तर महमुदुल्लाहने 31 धावा केल्या. यामुळे बागंलादेशने 153 धावा केल्या. विश्वचषक सामन्यात बांगलादेश क्रिकेट संघाने मोठमोठ्या संघांना घाम फोडला आहे. पण या सामन्यात नवख्या अमेरिकेसमोर बांगलादेश संघालाच घाम फुटला.

स्टीवन टेलरची भेदक गोलंदाजी
यूएसएच्या स्टीवन टेलरने भेदक गोलंदाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने 2 विकेट घेतल्या. तर सलामीला फलंदाजी करत त्याने 28 धावा केल्या. पण यानंतर यूएसए संघाची फलंदाजी गडगडली. सामना गमावणार असं वाटत असतानाच सहाव्या क्रमांकावर कोरी एंडरसन आणि हरमीत सिंहने मैदानावर येत चमत्कार घडवला. 

हमनप्रीतची दमदार फलंदाजी
भारतीय मूळ असलेला हरमीत सिंहने विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. हरमीत सिंहने भारताच्या अंडर-19 संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. हरमीतने आक्रमक फलंदाजी करत 3 षटकार आणि 2 चौकार लगावत 33 धावा केल्या. तर कोरी एंडरसनने 34 धावा केल्या. या दोघांच्या महत्वपूर्ण खेळीने अमेरिकेने बांगलादेशवर 5 विकेटने मात केली. या विजयाबरोबर तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत अमेरिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

टीम इंडियाला इशारा
बांगलादेशवरच्या विजयाने अमेरिकेने टीम इंडियाला इशारा दिला आहे. टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेचा ए ग्रुपमध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेचा समावेश आहे. 12 जूनला भारत आणि अमेरिकेत सामना होणार आहे.