दुबई : क्रिकेटमध्ये नो बॉलमुळे होणाऱ्या चुका आणि वाद रोखण्यासाठी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. नो बॉलबद्दलचा वाद कायमचा मिटवण्यासाठी आता नो बॉलचा निर्णय टीव्ही अंपायर म्हणजेच थर्ड अंपायर देणार आहे. पण सध्या मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये हा नियम ट्रायल म्हणून लागू केला जाणार आहे. पुढच्या सहा महिन्यांमध्ये कोणत्या सीरिजमध्ये ही ट्रायल घेण्यात येईल, याचा निर्णय आयसीसी घेणार आहे.
खेळामध्ये होणाऱ्या चुका रोखण्यासाठी आयसीसी तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. टीव्ही अंपायरना आणखी सशक्त करण्यासाठी आणि मैदानातल्या अंपायरचा भार कमी करण्यासाठी आयसीसीने नो बॉलबाबत हा निर्णय घेतला आहे. याआधी २०१६ साली इंग्लंड-पाकिस्तान झालेल्या वनडे सीरिजमध्ये ट्रायल म्हणून थर्ड अंपायरने नो बॉलचे निर्णय दिले होते. पण आता मोठ्या प्रमाणावर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
क्रिकइन्फो या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीचे महाप्रबंधक जोफ एलरडाईस यांनी सांगितलं, 'थर्ड अंपायरला बॉलरचा पुढचा पाय पडल्यानंतर काही सेकंदांनी फुटेज दिलं जाईल. यानंतर थर्ड अंपायर मैदानातल्या अंपायरला नो बॉल असेल तर माहिती देईल.' मागच्या ट्रायलमध्ये थर्ड अंपायरला फुटेज देण्यासाठी हॉकआय ऑपरेटरचा वापर केला गेला.