विराट कोहली मोडणार सचिनचा 100 शतकांचा विक्रम? 2027 पर्यंत प्रत्येक वर्षी इतक्या शतकांची गरज

Virat Kohli : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 100 शतकांची नोंद आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते सचिनचा हा विक्रम मोडू शकेल असा एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे विराट कोहली. 

राजीव कासले | Updated: Jul 26, 2024, 02:29 PM IST
विराट कोहली मोडणार सचिनचा 100 शतकांचा विक्रम? 2027 पर्यंत प्रत्येक वर्षी इतक्या शतकांची गरज title=

Virat Kohli : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेटमधले जवळपास सर्व विक्रम जमा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं त्याने केलेत. हा विक्रम आजही अबाधित आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 तर कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 तर कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकांचा समावेश आहे.

विराट तोडणार सचिनचा विक्रम
क्रिकेट जगतात सध्याच्या घडीला असा एकमेव फलंदाज आहे जो सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडू शकतो. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते सचिनचा हा विक्रम मोडू शकेल असा एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतकं जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं केली होती. तर विराट कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकंची नोंद आहे. याशिवाय विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 29 तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 शतक झळकावलं आहे. 

2027 पर्यंत प्रत्येक वर्षी इतक्या शतकांची गरज
विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतकांचा समावेश आहे. म्हणजे सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी 21 शतकांची गरज आहे. विराट कोहली आता 35 वर्षांचा आहे. पुढची आणखी तीन वर्ष म्हणजे 2027 पर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला तर त्याचं सर्वाधिक शतकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतो. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2027 पर्यंत प्रत्येक वर्षाला त्याला 7 शतकं ठोकावी लागतील.

महान फलंदाजांच्या यादीत समावेश
विराट कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. विराटने आतापर्यंत 113 कसोटी सामन्यात 49.16 च्या अॅव्हरेजने 8848 धावा केल्या आहेत. यात 29 शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटने 292 सामन्यात 58.68 च्या अॅव्हरेज 13848 धावा केल्यात. यात विराटने 50 शतकं आणि 72 अर्धशतकं झळकावली आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने 1 शतक आणि 38 अर्धशतकांच्या मदतीने 4188 धावा केल्या आहेत. टी20 वर्ल्ड कप 2024 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतकं

2. विराट कोहली (भारत) - 80 शतकं

3. रिकी पॉण्टिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतकं

4. कुमार संगाकारा (श्रीलंका) - 63 शतकं

5. जॅक कॅलिस (साउथ अफ्रीका) - 62 शतकं

6. हाशिम अमला (साउथ अफ्रीका) - 55 शतकं

7. महेला जयवर्धने (श्रीलंका) - 54 शतकं

8. ब्रायन लारा (वेस्टइंडीज) - 53 शतकं

9. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 49 शतकं

10. रोहित शर्मा (भारत) - 48 शतकं

विराट 2027 चा ODI वर्ल्ड कप खेळणार?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. रोहित आणि विराट दोघंही वर्ल्ड क्लास फलंदाज आहेत असं गंभीरने म्हटलंय.