श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, रोहित-विराटच्या मेहनतीचं फळ

Team India New Jersey : भारत आणि श्रीलंकेदरम्यान 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीत एक मोठा बदल झालाय.

राजीव कासले | Updated: Jul 25, 2024, 07:12 PM IST
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, रोहित-विराटच्या मेहनतीचं फळ title=

Team India New Jersey : भारत आणि श्रीलंकादरम्यान 27 जुलैपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला (India vs Sri Lanka T20 Series) सुरुवात होईल. श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी (Team India) ही मालिका विशेष महत्त्वाची आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नव्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवा प्रशिक्षक कोणती रणनिती घेऊन मैदानात उतरतो आहे, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ही मालिका टीम इंडियासाठी आणखी एक कारणाने महत्त्वाची ठरणार आहे. ब्ल्यू ब्रिगेड नव्या जर्सीत (Jersey) मैदानावर दिसणार आहे. जर्सीतल्या नव्या बदलासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने मेहनत घेतली होती. 

टीम इंडियाची नवी जर्सी
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचे खेळाडू स्पेशल जर्सीमध्ये दिसणार आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी नवी जर्सी लाँच करण्यात आली होती. आता श्रीलंका दौऱ्यासाठी या जर्सीत एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा बदल अभिमानाचा आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर एक स्टार वाढवण्यात आला आहे. वास्तविक हे दोन स्टार टी20 वर्ल्ड चॅम्पियनशिपचं प्रतीक आहेत. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं होतं. तर 2024 मध्ये टीम इंडियाने दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर आता दोन स्टार दिसणार आहेत.

रोहित-विराटची मेहनत
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 चं जेतेपद पटकावलं. या संपूर्ण स्पर्धेत रोहित शर्माने दमदार फलंदाजी केली. तर अंतिम सामन्यात विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत विजयात मोलाचं योगदान दिलं. या दोघांच्या मेहनतीमुळे टीम इंडियाच्या जर्सीवर अभिमानाने एक स्टार झळकला आहे.

टीम इंडियाची नवी सुरुवात
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या सीनिअर खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा संघ लंकेच्या मैदानात दिसणार आहे. 

भारताचा टी20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

भारत-श्रीलंका टी20 सामना, सामने
27 जुलै- पहिला टी20 सामना, पल्लेकेल
28 जुलै- दूसरा टी20 सामना, पल्लेकेल
30 जुलै- तीसरा टी20 सामना, पल्लेकेल