India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात टी20 सामन्यांनी होणार असून पहिला टी20 सामना येत्या 10 तारखेला खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने (BCCI) जवळपास 35 खेळाडूंना संधी दिली आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटसाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहे. सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) टी20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर केएल राहुल एकदिवसीय आणि रोहित शर्माकडे कसोटी संघाची धुरा असणार आहे.
भारतीय खेळाडूंचा अपमान?
टी20 मालिकेसाठी सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली युवा संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या प्रवासाचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यावर विमानतळावर टीम इंडियाच्या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. भारतीय खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी हजारो क्रिकेट चाहते विमानतळाव उपस्थित होते. पण या व्हिडिओत एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे भारतीय खेळाडूंना स्वत:च सामान डोक्यावर घेऊन जावं लागलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय खेळाडूंचा अपमान झाला अशी चर्चा रंगली आहे.
खेळाडूंचा अपमान झाला का?
बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर करत टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओत टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडू दिसत आहेत. डोक्यावर ट्रॉली घेऊन पळतानाचा सीनही याच व्हिडिओतला आहे. वास्तविक हा कोणताही अपमान नव्हता तर एक मजेशीर प्रसंग होता. पावसापासून वाचण्यासाठी खेळाडूंनी डोक्यावर बॅग घेत बसपर्यंत धाव घेतली. या प्रसंगातील एक क्षण व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे.
South Africa bound #TeamIndia are here #SAvIND pic.twitter.com/V2ES96GDw8
— BCCI (@BCCI) December 7, 2023
भारत-द.आफ्रिका टी20 मालिका
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला डरबनमध्ये रंगणार आहे. टी20 विश्वचषक 2024 आधी खेळवली जाणारी ही मालिका टीम इंडियासाठी अतिशय महत्त्वाची आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर टीम इंडिया अफगाणिस्ताविरुद्ध टी20 मालिका खेळवली जाणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2024 जानेवारी ही मालिका खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), रवींद्र जड़ेजा (उप-कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, दीपक चाहर, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार