विंडीज दौऱ्यातून डच्चू, आशिया क्रीडा स्पर्धेतही नाही... टीम इंडियातल्या 'या' दिग्गज खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली. नुकतीच आशिया क्रीडा स्पर्धेसाठीचा संघही घोषित करण्यात आला आहे. पण या दोन्हीमधून टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला वगळण्यात आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 15, 2023, 08:04 PM IST
विंडीज दौऱ्यातून डच्चू, आशिया क्रीडा स्पर्धेतही नाही... टीम इंडियातल्या 'या' दिग्गज खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली? title=

Indian Cricket Team: वेस्ट इंडिज दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट मालिका (ODI, T20 Squad) तसंच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games) बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. या दोन्ही स्पर्धांसाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंना (Young Players) संधी दिली आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL 2023) दमदार कामगिरी करणारे यशस्व जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, रिंकू शर्मा, साई सुदर्शन या खेळाडूंचं नशीब उघडलंय. पण युवा खेळाडूंना संधी मिळत असताना टीम इंडियातले दिग्गज खेळाडू मात्र दुर्लक्षित होत चालले आहेत. काही खेळाडूंची तर क्रिकेट कारकिर्दच धोक्यात आली आहे. यापैकीच एक खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा 'गब्बर' अर्थात शिखर धवन.

शिखर धवन दुर्लक्षित
टीम इंडियाचा सलामीचा आक्रमक डावखुरा फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) मोठ्या काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज म्हणून शिखर धवनने एक काळ गाजवला होता. पण गेल्या काही काळापासून त्याची कामगिरी खालावली, त्यातच युवा खेळाडूंच्या एन्ट्रीमुळे शिखर धवन मागे पडला. रोहित शर्मा, विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिल्यावर शिखर धवनकडे कर्णधारपद सोपावलं जात होतं. तेव्हापासूनच शिखर धवनच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. बीसीसीआयने शुक्रवारी एक घोषणा केली आणि पुन्हा शिखर धवन चर्चेत आला. 

बीसीसीआयने शुक्रवारी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाची जबाबदारी शिखर धवनवर सोपवली जाईल अशी चर्चा होती. पण कर्णधारपद तर सोडाच शिखर धवनला संघातही स्थान मिळालं नाही. निवड समितीने युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला कर्णधारपदी बसवलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे शिखर धवनच्या कारकिर्द धोक्यात आली आहे. 

विश्वचषकात कमबॅक करणार? 
भारतीय निवड समितीने शिखर धवनची निवड न करण्यामागे आणखी एक कारण असल्याचं बोललं जातंय. या वर्षाच्या अखेरीस भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेत धवनचा अनुभव टीम इंडियाला महत्त्वाचा ठरु शकतो. रोहित शर्माबरोबर सलामीसाठी शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, इशान किशन असे पर्याय आहेत. पण बॅकअप प्लान म्हणून शिखर धवनची टीम इंडियात निवड होऊ शकते. तसंच विश्वचषकापूर्वी कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी देखील शिखर धवनला विश्रांती देण्यात आली असेल अशी शक्यताही वर्तवली जातेय.

क्रिकेट कारकिर्द धोक्यात?
पण आशियाई क्रीडा स्पर्धेत निवड न करत निवड समितीने शिखर धवनला संकेत दिला असण्याचीही शक्यता आहे. असं असेल तर धवनची क्रिकेट कारकिर्द धोक्यात आली आहे. धवनने भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर 2022 ला खेळला होता. पण यानंतर तो सातत्याने टीम इंडियातून बाहेर आहे. येत्या एक-दोन महिन्यात एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येईल. पण यातही धवनचं नाव नसेल तर त्याचं भविष्यात टीम इंडियात कमबॅक करणं जवळपास संपुष्टात येईल.