Sachin Tendulkar vs Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुसरा कसोटी सामना (India vs West Indies 2nd Test) खेळवला जातोय. करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. कारण विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रिकेट कारकिर्दीतील हा पाचशेवा आंतरराष्ट्रीय सामना आहे. 500 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि राहुल द्रविड यांच्या नावावर आहे. यात विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) कामगिरीची नेहमीच तुलना केली जाते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम कोणता खेळाडू मोडेल, तर तो विराट कोहली असंच उत्तर येतं. विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये 76 शतकं जमा आहेत.
सचिन-विराटमध्ये तुलना
सचिन तेंडुलकरने आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 100 शतकं केली आहेत. हा विक्रम अद्यापही अबाधित आहे. तर विराट कोहलीने 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 76 शतकं केली आहेत. यात कसोटी क्रिकेटमध्ये 28, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 46 तर टी20 क्रिकेटमध्ये एका शतकाचा समावेश आहे. आकडेवारी पाहिली तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहलीचं पारडं जड आहे.
विराट Vs सचिन- 100 सामने
विराटने 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात 44.37 च्या स्ट्राईकरेटने 4038 धावा केल्या. यात त्याने 11 शतकं आणि 23 अर्धशतकं ठोकली. तर सचिनने 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात 39.22 च्या स्ट्राईक रेटने 3766 धावा केल्या. यात 7 अर्धशतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश होता.
विराट Vs सचिन- 200 सामने
6 नोव्हेंबर 2014 मध्ये विराट कोहली आपल्या क्रिकेट कारकिर्दीतला 200 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यादरम्यान तो 8777 धावांपर्यंत पोहोचला होता. 26 शतक आणि 49 अर्धशतक त्याच्या नावावर जमा झाले होते. तर 200 व्या सामन्यापर्यंत सचिनच्या खात्यात 8815 धावा जमा होत्या.
विराट Vs सचिन- 300 सामने
विराट कोहलीने 300 व्या सामन्यापर्यंत 45 शतकांच्या जोरावर 14749 धावा बनवल्या होत्या. तर 300 व्या सामन्यात सचिन 14183 धावांवर पोहोचला होता. पण शतकांच्या बाबतीत सचिन विराटपेक्षा दोन शतकांनी पुढे होता. सचिनच्या नावावर 47 शतकं जमा होती.
विराट Vs सचिन- 400 सामने
300 ते 400 सामन्यांच्या टप्प्यात विराट सुसाट होता. 70 शतकं आणि 21359 धावा त्याच्या नावावर जमा होत्या. तर अर्धशतकांची सेंच्युरी पूर्ण केली. सचिन तेंडुलकरच्या नावावर 400 सामन्यांपर्यंत 19949 धावा जमा होत्या. तर 63 शतकं आणि 90 अर्धशतकं जमा होती.
विराट Vs सचिन- 500 सामने
सचिनने 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा टप्पा गाठला त्यावेळी त्याने 24874 धावा केल्या होत्या आणि 75 शतक आणि 114 अर्धशतकं केली होती. तर विराट पाचवेशा आंतरराष्ट्रीय सामने खेळतोय आणि त्याच्या नावावर 25548 धावा जमा झाल्या आहेत. आणि 76 शतकं त्याने केली आहेत.
एकूणच आकडेवारी पाहिली तर विराट कोहली सचिनपेक्षा एक पाऊल पुढे आहे. हाच फॉर्म कायम राहिला तर विराट सचिनच्या शंभर शतकांचा विक्रमही मोडेल अशी अपेक्षा क्रिकेट प्रेमी व्यक्त करतायत.