आधी लाथ मारून हाकललं, सिलेक्शनमध्येही घोटाळा.. वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीचा गौप्यस्फोट

Team India : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. खेळाडूंची निवड करताना मोठा घोटाळा झाल्याचं मोहम्मद शमीने म्हटलंय. या आरोपाने भारतीय क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 23, 2023, 04:31 PM IST
आधी लाथ मारून हाकललं, सिलेक्शनमध्येही घोटाळा.. वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीचा गौप्यस्फोट title=

Mohammed Shami Struggle: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammad Shami) स्पर्धेनंतर धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. क्रिकेट सिलेक्शनमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं शमीने एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयसीसी विश्वचषकात मोहम्मद शमीला उशीराने संधी देण्यात आली. पण मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट त्याच्या नावावर आहे. तीन वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम त्याने केलाय. यात सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शमीने तब्बल 7 विकेट घेतल्या. स्पर्धेत शमीने दिलेल्या एका मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

मोहम्मद शमीाच गौप्यस्फोट
मोहम्मद शमीने PUMA इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. उत्तर प्रदेश रणजी संघातून (UP Ranji Team) लाथ मारून हाकललं जात होतं असं शमीने म्हटलंय. शमीने संघ निवडीतही मोठा घोटाळा होत असल्याचं सांगितलं. मी सलग दोन वर्ष यूपी रणजी ट्रॉफीची (Ranji Trophy) ट्रायल देण्यासाठी गेलो होते. पण जेव्हा फायनल राऊंड यायचा तेव्हा मला लात मारुन बाहेर काढलं जायचं. पहिल्यावेळी जेव्ही माझं सिलेक्शन झालं नाही तेव्हा मी फारसा विचार केला नाही. पम दुसऱ्या वर्षी पुन्हा तसाच प्रकार माझ्याबाबत घडला, असा गौप्यस्फोट शमीने केलाय.  

भावाने फाडला फॉर्म
सिलेक्शन ट्रायलला माझ्याबरोबर माझा भाऊ असायचा. पहिल्या वर्षी माझी निवड झाली नाही, दुसऱ्या वर्षी ट्रायलसाठी तब्बल 1600 मुलं आली होती आणि तीन दिवस ट्रायल चालणार होते. त्यामुळे मोठ्या भावाने निवड समितीच्या प्रमुखांची भेट घेतली. पण निवड समितीने प्रमुखाने दिलेलं उत्तर ऐकून भावाचा पारा चढला. त्यांनी सांगितलं 'मी ज्या खूर्चीवर बसलो आहे ती खूर्ची हलवून दाखव, मग तुझा भाऊ सिलेक्ट होईल, नाही तर सॉरी' हे उत्तर ऐकून मोठ्या भावाने माझा फॉर्म फाडून टाकला. त्यानंतर यापुढे युपी संघातून खेळणार नसल्याचा पण शमीच्या भावाने केला. 

युपीनंतर शमी त्रिपुराला गेला. पण त्रिपुरा संघातही शमीची निवड झाली नाही. शमीच्या प्रशिक्षकाने त्याला कोलकाताला पाठवलं, तिथे एका क्लबसाठी सिलेक्शन होतं, पण तिथे मैदानावर जागाच कमी होती. इतक्याच जागेत तुला रनअप घ्यावा लागेल असं शमीला सांगण्यात आलं. त्यानंतर आठ ते दहा चेंडू गोलंदाजी केल्यानंतर आपल्याला थांबवण्यात आलं आणि नंतर कळवू असं सांगण्यात आलं. पण दोन दिवसांनंतरही काहीच उत्तर दिलं नाही. कोलकात्याला मी 2500 रुपये घेऊन आलो होते. त्यातले केवळ हजार रुपये उरले होते. सुदैवाने तिसऱ्या दिवशी क्लबकडून सिलेक्शन झाल्याचं सांगण्यात आलं. पण त्यातही पैसे मिळणार नाही, केवळ राहाण्याची आणि खाण्याची सोय होईल अशी अट क्लबने ठेवली. 

ज्या क्लबकडून आपण खेळतो होतो त्या क्लबसाठी एका स्पर्धेत मी 9 सामन्यात 45 विकेट घेतल्या आणि क्लबच्या मॅनेजरने खूश होऊन 25 हजार रुपये आणि ट्रेनचं तिकिट दिलं. मी घरी येऊन ते सर्व पैसे आईच्या हातात ठेवलं. पण वडिलांनी ते पैसे परत केले आणि तुझी पहिली कमाई आहे, त्याचा तू वापर करं, असं सांगितलं. या पैशाने शमीने बूट आणि क्रिकेटचं सामान खरेदी केलं. क्रिकेटची सुरुवात खूप संघर्षमय होती, असं शमीने या मुलाखतीत सांगितलं.