महेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, तब्बल 15 कोटींचा लावला चुना

MS Dhoni Ranchi News : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात फसवणूकीचं प्रकरण समोर आलं आहे. स्वत: धोनीने रांची कोर्टात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धोनीच्या निकटवर्तीयांनीच त्याची फसवणूक केली असून तब्बल 15 कोटींचा गंडा घातल्याचं बोललं जात आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 5, 2024, 04:48 PM IST
महेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, तब्बल 15 कोटींचा लावला चुना title=

MS Dhoni Ranchi News : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या (Aarka Sports and Management Limited) मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) आणि सौम्या विश्वासविरुद्ध (Soumya Vishwash) रांची कोर्टात अपराधिक तक्रार दाखल केली आहे. मिहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र म्हणून ओळखला जातो. तो धोनीचा बिझनेस पार्टनरही आहे. मिहिरने धोनीबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

काय आहे नेमकं प्रकरण?
मिहिर दिवाकरने जगभरात क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी 2017 मध्ये एमएस धोनीबरोबर करार केला. पण या करारतील अटींचं मिहिरने पालन केलं नाही. करारानुसार अरका स्पोर्ट्स फ्रेंचाईजीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात समान विभागनी केली जाणार होती. पण मिहिरने कोणत्याही नियम आणि अटिंची पूर्तता केली नाही.

धोनीला 15 कोटींचं नुकसान
महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अरका स्पोर्ट्समधून अॅथॉरिटी लेटर परत घेतलं. त्यानंतर धोनीच्या कायदे विभागाने मिहिर दिवाकरला अनेक नोटिसा पाठवल्या. पण त्याला कोणतंही उत्तर मिळालं नाही. त्यानंतर धोनीचे वकिल दयानंद सिंह यांनी या सर्व प्रकारात धोनीला 15 कोटींचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. 

ऋषभ पंतचीही फसवणूक
धोनीप्रमाणेच टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंतला त्याच्या निकटवर्तीयाने करोडो रुयांचा चुना लावला. मृणांक सिंह असं त्या व्यक्तीचं नाव आहे. 25 डिसेंबरला त्याला पोलिसांनी अटक केली. मृणांक सिंह या हरियाणातल्या फरीदाबाद इथं राहाणारा आहे. मृणांक सिंहने अंडर-19 राज्य क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मृणांकने ऋषभ पंतला महागडी घड्याळं स्वस्तात देण्याचं आमिष दाखवलं होतं. यासाठी त्याने पंतकडून 1.63 कोटी रुपये घेतले होते. मृणांक महागडी घड्याळं, बॅग्स आणि दागिन्यांचा उद्योग करत असल्याचा दावा केला होता. 

आयपीएलमध्ये धोनी खेळणार
महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या कारकिर्दीत टीम इंडियाने 3 आयसीसी ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं. तर आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने तब्बल 5 वेळा जेतेपद पटकावलं. 2024 च्या आयपीएलमध्ये धोनी खेळताना दिसणार आहे. हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचं बोललं जात आहे.