IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL 2025 Mega Auction) पार पडणार आहे. याआधी आयपीएलच्या सर्व 10 फ्रँचाईजी मालकांची मिटींग पार पडली. या मिटिंगमध्ये सर्व मालकांनी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलकडे विदेशी खेळाडूंच्या (Overseas Players) लिलावाबाबत एक मागणी केली. लिलावात फ्रँचाईजी विदेशी खेळाडूंवर करोडोंची बोली लावून संघात घेतात. पण यानंतर अनेक खेळाडू माघार घेतात. त्यामुळे संघांचं संपूर्ण गणित बिघडतं. रिपोर्टनुसार लिलावात विक्री झाल्यानंतर माघार घेणाऱ्या विदेशी खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी आणण्याची मागणी सर्व संघ मालकांनी केली आहे. विदेशी खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये आपलं नाव रजिस्टर करणं अनिवार्य करण्यात यावं अशी मागणीही संघ मालकांनी केलीय.
संघ मालक विदेशी खेळाडूंवर नाराज
आयपीएलमधले सर्व संघ मालक विदेश खेळाडूंवर नाराज आहेत. आयपीएल लिलावावेळी विदेश खेळाडू नाव नोंदवतात. पण बोली लावल्यानंतर नाव मागे घेतात. यामुळे संघाच्या संपूर्ण कामगिरीवर परिणाम होतो. लिलावाआधी संघ व्यवास्थपानाने काही रणनिती तयारी केलेली असते. पण विक्रीनंतर विदेशी खेळाडूंनी माघार घेतल्याने संपूर्ण रणनिती बिघडते. त्यामुळे ऐनवेळी दुसऱ्या खेळाडूंवर बोली लावत संघात घ्यावं लागतं असं संघ मालकांचं म्हणणं आहे. खेळाडू दुखापतग्रस्त असल्यास त्याला सूट दिली जाऊ शकते. पण अनेक विदेशी खेळाडू लिलावात कमी किंमत मिळाल्याने माघार घेतात.
अनेक विदेश खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईजला संघात घेतलं जातं. पण या रकमेवर ते समाधानी नसतात, पैसे वाढवून दिले तर आयपीएलमध्ये खेळण्यास तयार असतात, अन्यथा काहीतरी कारणं देऊन ते आयपीएलमधून माघार घेतात.
खेळाडूंचं नाव रजिस्टर करण्याची मागणी
आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाइजींनी मेगा ऑक्शनमध्ये विदेशी खेळाडूंचं नाव रजिस्टर करणं अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार काही विदेशी खेळाडू मेगा ऑक्शन ऐवजी मिनी ऑक्शनमध्ये आपलं नवा रजिस्टर करतात. कारण मिनी ऑक्शनमध्ये कमी खेळाडू असतात, ज्यामुळे मोठी बोली लागण्याची शक्यता असते. याऊलट मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू असल्याने बोली कमी लागण्याची शक्यता असते.
2022 मध्ये झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली 15.25 कोटी इतकी होती. तर 2023 मध्ये झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये तब्बल 24 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावण्यात आली. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कवर ही बोली लावली होती. तर सनरायजर्स हैदराबादने पॅट कमिन्ससाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजले होते.