अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम? वेस्ट इंडिज दौरा ठरणार शेवटचा

IND vs WI 2nd Test, Ajinkya Rahane: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दमदार फलंदाजी करत अजिंक्य रहाणेने टीम इंडियात जागा मिळवली. इतकंच नाही तर टीम इंडियात त्याला उपकर्णधारपदही देण्यात आलं. पण रहाणेचं हे पुनरागमन फारसं यशस्वी ठरलेलं नाही. त्या त्याच्या कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

राजीव कासले | Updated: Jul 21, 2023, 03:23 PM IST
अजिंक्य रहाणेच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम? वेस्ट इंडिज दौरा ठरणार शेवटचा title=

IND vs WI 2nd Test, Ajinkya Rahane: भारतीय क्रिकेट संघात (Team India) जागा मिळवणं जितकं कठिण आहे, तितकंच स्वत:ची जागा टिकवून ठेवणं आव्हानात्मक असतं. युवा खेळाडू संधीच्या शोधात असतात तर अनुभवी खेळाडूंना प्रत्येक मालिकेत स्वत:ला सिद्ध करावं लागतं. टीम इंडियात जागा टिकवणं हे आता जास्त कठिण बनवलंय. अनेक युवा खेळाडू संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. अशातही अजिंक्य राहाणेने टीम इंडियात चक्क कमबॅक केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) टीम इंडियाचे इतर फलंदाज फ्लॉप ठरत असताना अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) एकटा मैदानावर टिकून राहिला.  या कामगिरीच्या जोरावर अजिंक्य रहाणेने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात जागा मिळवली.

जवळपास एक दशक कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाजीचा कणा असलेल्या अजिंक्य राहणेला 2022 मध्ये संघातून ड्रॉप करण्यात आलं. 2022 जानेवारीमध्ये रहाणेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर जवळपास सव्वा वर्ष तो टीम बाहेर असलेल्या रहाणेची थेट वर्ल्ज टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियात एन्ट्री झाली. 

विंडिज दौऱ्यात फ्लॉप
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अजिंक्य राहणे सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये 89 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 46 धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यात रहाणेची निवड होणार हे जवळपास निश्चित होतं. पण रहाणेची केवळ निवडच झाली नाही तर टीम इंडियात त्याला उप कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली. वेस्ट इंडिज दौऱ्यात अजिंक्य रहाणेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण यात तो अपयशी ठरला. विंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये तो केवळ 2 धावा करुन बाद झाला. 

दुसऱ्या कसोटीतही फ्लॉप
दुसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकत पहिली फलंदाजी घेतली. पहिल्या कसोटी शतक करणाऱ्या यशस्वी जयस्वालने दुसऱ्या कसोटीतही अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्माने 80 धावा केल्या. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडूनही क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. रहाणेने 36 चेंडूंचा सामना केला पण त्याला केवळ 8 धावा करता आल्या. ग्रॅब्रिअलने त्याला क्लिन बोल्ड केलं. 

क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक?
आता दुसऱ्या कसोटीची दुसरी इनिंग बाकी आहे. यात चांगल्या धावा केल्या नाहीत तर अजिंक रहाणेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागण्याचं जवळपास निश्चित आहे. याला कारणही तसंच आहे. वेस्टइंडिज दौऱ्यानंतर थेट पाच महिन्यांनी टीम इंडिया कसोटी क्रिकेट खेळेल. हा पूर्ण काळ रहाणे टीम इंडियाच्या बाहेर असेल. दुसरीकडे युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याचा बीसीसीय प्रयोग करतंय. यशस्वी जयस्वाल, इशान किशन सारखे युवा खेळाडू आपली जागा पक्की करतातय अशात रहाणे पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.