Ind vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान

Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 21, 2023, 05:21 PM IST
Ind vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू?  असा असणार टीम इंडियाचा प्लान

Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी म्हणजे 22 मार्चला चेन्नईत (Chennai) खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 5 विकेटने जिंकला. पण दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने टीम इंडियाचा धुव्वा उडवला. त्यामुळे तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. हा सामना जिंकणारा संघ एकदिवसीय मालिकेवर कब्जा करणार असून एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या (ODI World Cup 2023) तोंडावर हा मालिका विजय महत्त्वाचा ठरणार आहे.

सूर्यकुमारला मिळणार डच्चू?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रमुक फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले होते. यातही सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. टी20 मैदान गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवला एकदिवसीय सामन्यात मात्र सूर गवसत नाहीए. पहिल्या दोन्ही सामन्यात त्याला खातंही खोलता आलेलं नाही. दोन्ही सामन्यात मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे सूर्यकुमारला तिसऱ्या सामन्यात संधी मिळते की नाही याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

असं असलं तरी सूर्यकुमारला आणखी संधी मिळू शकते असे संकेत कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दिले आहेत. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. केवळ दोन सामन्यातील कामगिरी पाहून सूर्यकुमार यादवबाबत निर्णय घेता येणार नाही, सात ते आठ सामन्यात त्याला संधी द्यायला हवी असं मत कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केलंय.

चेन्नईत वेगवान गोलंदाजाला मदत
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर (Chennai Chepauk Stadium) खेळवला जाणार आहे. खेळावर पावसाचं सावट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चेन्नईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. त्यामुळे पहिल्या दहा षटकांमध्ये भारतीय फलंदाजांना सावध खेळावं लागणार आहे. त्यातही मिचेल स्टार्कसमोर भारतीय फलंदाजांनी विकेट टिकवावी लागणार आहे. 

या खेळाडूंना मिळू शकतो डच्चू
चेन्नईचं पीच पाहाता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सीराजची जागा पक्की आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर किंवा उमरान मलिकाला संधी मिळू शकते. यातही उमरान मलिकचं पारडं जड आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीतला वेग चेपॉकच्या खेळपट्टीवर महत्त्वाचा ठरू शकतो. उमरान आणि शार्दुलला संधी मिळण्यास अक्षर पटेलला टीम बाहेर बसावं लागेल. याशिवाय चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट

ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेविस हेड, मार्नुस लाबुशेन, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, एलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरन ग्रीन, जोश इंग्लिस, सीन एबॉट, एश्टन एगर, मिशेल स्टार्क, नाथन एलिस, एडम जाम्पा