India vs South Africa 2nd Test : केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवसात भारतीय गोलंदाजांनी कमावलेल्या कामगिरीवर भारतीय फलंदाजांनी पाणी फेरलं. सामन्याच्या पहिला दिवस दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवसात तब्बल दोन्ही संघांच्या तेवीस विकेट गेल्या. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांवर गारद केला. पण भारतीय फलंदाजांना याचा फायदा उचलता आला नाही. भारताचाही पहिला डाव 153 धावांवर गुंडाळला गेला. धक्कादायक म्हणजे भारताचे सहा फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. (team india all out for 153 runs)
भारताच्या डावाची खराब सुरुवात
भारताच्या डावाची सुरवातच खराब झाली. सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल खात न खोलताच बाद झाला. भारतीय इनिंगमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक धावा केल्या. विराटने 59 चेंडूत 46 धावा केल्या. यात त्याने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा 39 आणि शुभमन गिलने 36 धावा केल्या. पण कमाल तर यापुढे झाली. 153 धावसंख्येवर भारताला पाचवा धक्का बसला. केएल राहुल (KL Rahul) 8 धावाकरुन बाद झाला. लुंगी एनगिडीने 34 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर राहुलची विकेट घेतली. यानंतर त्याच धावसंख्येवर संपूर्ण भारतीय संघ गारद झाला.
सहाव्या विकेटपासून भारतीय फलंदाजांची मैदानावर फक्त हजेरी लावण्याची स्पर्धा सुरु झाली. लुंगी एनगिडीने 34 व्या षटकात तीन विकेट घेतल्या. पहिल्या चेंडूवर केएल राहुल (8) बाद झाला. तर तिसऱअया चेंडूवर रवींद्र जडेजा (0) पॅव्हेलिअनमध्ये परतला. पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराह (0) बाद झाला. 35 व्या षटकात कागिसो रबाडाने दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. त्याच षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराज (0) धावबाद झाला. तर 5 व्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णा (0) अॅडम मार्करमच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
प्रसिद्ध कृष्णाच्या विकेटबरोबर भारताचा डावही संपुष्टात आला. केवळ 11 चेंडूत टीम इंडियाचे सहा फलंदाज बाद झाले. दक्षिण आफ्रिकेतर्फे कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
दुसऱ्या इनिंगमध्येही दक्षिण आफ्रिकेला धक्का
पहिल्या डावात भारताने 98 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अवघ्या 62 धावात दक्षिण आफ्रिकेने तीन विकेट गमावले. मुकेश कुमारने 2 तर जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडे 36 धावांची आघाडी आहे.