ICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली

T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. 

Updated: Feb 8, 2023, 06:13 PM IST
ICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली title=

ICC Latest T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) टी20 क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. यात टीम इंडियाचा (Team India) युवा स्टार फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) मोठा उलटफेर केला आहे. ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाचा मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या खात्यात 906 गुण जमा आहेत. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात शतक ठोकणाऱ्या शुभमन गिलने यादीत मोठी झेप घेतली आहे. क्रिकेट कारकिर्दीतील हे त्याचं बेस्ट रँकिंग ठरली आहे.

शुभमन गिलची मोठी झेप
क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम करणारा शुभमन गिल एकदिवस क्रमवारीत सहाव्या तर कसोटी क्रमवारीत 62 व्या स्थानावर आहे. आता टी-20 क्रमवारीतही त्याने मोठी झेप घेतली आहे गिलने थेट 168 स्थानांची झेप घेतली असून टी20 क्रमवाती तो आता तिसाव्या क्रमांकावर आहे. याआधी शुभमन आयसीसी टी20 क्रमवारीत पहिल्या शंभरमध्येही नव्हता. पण न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील धमाकेदार कामगिरीनंतर शुभमन गिल थेट तिसाव्या स्थानावर पोहोचला आहे.

हार्दिक पांड्याचीही उडी
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) आयसीसी टी20 ऑलराऊंड प्लेअर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हार्दिक पांड्याच्या खात्यात 250 रेटिंग पॉईंट्स जमा झाले आहेत. तर 252 रेटिंग पॉईंटसह बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) पहिल्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याशिवाय डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) गोलंदाजाच्या यादीत 13 वा क्रमांक पटकावला आहे. पण टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही.

विराट कोहलीचं नुकसान
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) मात्र या यादीत नुकसान सहन करावं लागलं आहे. विराट कोहलीच्या क्रमवारीत एक अंकाची घसरण झाली असून तो आता 15 व्या स्थानावर आहे. तर के एल राहुल (KL Rahul) 27 आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 29 व्या स्थानावर आहे. इशात किशनच्या (Ishan Kishan) रेटिंग पॉईंटमध्येही घसरण झाली असून तो 48 व्या स्थानावर फेकला गेला आहे. याशिवाय भुवनेश्वर कुमार 21, आर अश्विन 29 आणि अक्षर पटेल 30 वा स्थानावर आहे.