Corona : खेळाडूंच्या पगार कपातीबाबत बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

Updated: Apr 5, 2020, 07:02 PM IST
Corona : खेळाडूंच्या पगार कपातीबाबत बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. भारतातली सध्याची परिस्थिती बघता १५ एप्रिलपासूनही आयपीएल स्पर्धा सुरू होणं जवळपास अशक्य आहे. कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिजही रद्द करण्यात आली आहे. आता आयपीएल रद्द करावी लागली, तर बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होणार आहे.

बीसीसीआयला आर्थिक नुकसान झालं तर खेळाडूंनीही पगार कपातीची तयारी ठेवावी, असं वक्तव्य इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआयने खेळाडूंच्या पगार कपातीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांचं हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितलं आहे.

'खेळाडूंच्या पगार कपातीबाबत चर्चा झाली नाही. याबाबत आम्ही विचारही केलेला नाही. कोणावरही परिणाम होणार नाही, असा निर्णय आम्ही घेऊ. गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर याबाबत चर्चा होऊ शकते,' असं अरुण धुमाळ म्हणाले.

दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या मानधनात कपात होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मात्र मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या मानधनात २० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. बोर्डाने ठेवलेला हा प्रस्ताव खेळाडूंनी मान्य केल्याचं खेळाडूंच्या संघटनेने सांगितलं आहे.