कोलकाता : कोलकातामध्ये झालेल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत करून मालिका जिंकली. रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 73 धावांनी विजय मिळवला. रोहित शर्मा आणि टी-20 फॉरमॅटमध्ये नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला विजय आहे. विजयानंतर राहुल द्रविड म्हणाला की, चांगली सुरुवात करणं केव्हाही चांगलं असतं.
मात्र, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी असंही सांगितलं की, या मालिकेत सर्वजण चांगले खेळलेत. मात्र या विजयानंतरही आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, "हा एक चांगला मालिका विजय होता, सर्वांनी संपूर्ण मालिकेत चांगला खेळ केला. विजयाने सुरुवात करणं चांगलं वाटतं. परंतु आम्हाला वास्तव पाहावं लागेल. विजयानंतरही पाय जमिनीवरच ठेवावं लागतात."
यादरम्यान राहुल द्रविडनेही शेड्यूलवर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की, "न्यूझीलंडसाठी हे सोपं नव्हतं. 6 दिवसांत 3 टी-20 सामने खेळणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ते सोपं जाणार नव्हतं. या मालिकेतून शिकून आपल्यालाही पुढे जायचं आहे."
या मालिकेनंतरच्या प्रवासाबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, "पुढील 10 महिन्यांत आम्हाला अनेक सामने खेळायचे आहेत. वर्ल्डकपपूर्वी देखील सतत क्रिकेट खेळायचं आहे. अशा स्थितीत यादरम्यान अनेक चढ-उतार येऊ शकतात. मात्र नवीन खेळाडूंसह सातत्याने चांगली कामगिरी करणं संघासाठी चांगलं आहे. अनेक खेळाडूंनी संधीचा फायदा घेतला."