मुंबई : श्रीलंका (Srilanka) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेनंतर (T-20 Series) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फलंदाज आणि गोलंदाजांची नवीन क्रमवारी (ICC T20 Rankings) जाहीर केली आहे.
नवीन क्रमवारीनुसार भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर के एल राहुल (KL Rahul) अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. तर रोहित शर्माची (Rohit Sharma) 21व्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर गोलंदाजांच्या पहिल्या 10 क्रमाकांच्या यादीत एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.
फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा डेव्हिड मलान आघाडीवर आहे. अव्वल सात फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आठव्या स्थानावर पोहचला आहे तर वेस्ट इंडिजचा एविन लुईस एक स्थानाने आघाडी घेत नवव्या स्थानावर आला आहे.
गोलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शम्सी अव्वल स्थानी कायम आहे, त्यानंतर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि अफगाणिस्तानचा रशीद खान यांचा क्रमांक लागतो. गोलंदाजी क्रमवारीत भारताचा अव्वल गोलंदाज भुवनेश्वर कुमार 12 व्या स्थानावर आहे. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर हा 18 व्या स्थानासह अव्वल 20 मध्ये दुसरा भारतीय गोलंदाज आहे. युझवेंद्र चहल हा एकमेव गोलंदाज आहे ज्याच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. तो आता 25 व्या स्थानावर आहे. मात्र, टी -20 विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल 20 मध्ये हार्दिक पंड्या एकमेव भारतीय आहे. त्याने 98 गुणांसह यादीत स्थान मिळवलं आहे. भारताने श्रीलंकेत शेवटची टी -20 मालिका खेळली आणि त्यानंतर संघाने या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही.