बॉक्सिंग रिंगमध्ये झालेल्या दुखापतीनंतर २७ वर्षांच्या बॉक्सरचा मृत्यू

मी तुझ्यासाठी वर्ल्ड टायटल जिंकेल -  भावूक झालेल्या प्रतिस्पर्धी खेळाडू चार्ल्स कॉनवेलची प्रतिक्रिया 

Updated: Oct 17, 2019, 06:07 PM IST
बॉक्सिंग रिंगमध्ये झालेल्या दुखापतीनंतर २७ वर्षांच्या बॉक्सरचा मृत्यू title=

लंडन : बॉक्सिंग प्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. अमेरिकन बॉक्सर पॅट्रिट डे (Patrick Day) याचा सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर मृत्यू झालाय. पॅट्रिट अवघ्या २७ वर्षांचा होता. २०१३ साली तो प्रो-बॉक्सर बनला होता. सुपर-वॉल्टरवेट कॅटेगिरीममध्ये त्याचा चांगलाच दबदबा होता. जून २०१० मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये, डब्ल्यूबीसी आणि आयबीएफच्या टॉप-१० बॉक्सरांच्या यादीत पॅट्रिट डे याच्याही नावाचा समावेश होता. 

१२ ऑक्टोबर रोजी शिकागोमध्ये 'सुपर-वॉल्टरवेट बाऊट'मध्ये पॅट्रिट डे याचा चार्ल्स कॉनवेल (Charles Conwell) याच्याशी सामना झाला होता. या दरम्यान त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर १० व्या राऊंडमध्ये त्याला नॉकआऊट सहन करावा लागला. 

त्यानंतर पॅट्रिट कोमामध्ये गेला होता. इथं त्याच्यावर मेंजवर सर्जरीही पार पडली. परंतु, त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. बुधवारी डॉक्टरांनी पॅट्रिट डे याच्या निधनाची पृष्टी केली. 

'पॅट्रिट एक चांगला मुलगा, भाऊ आणि मित्र होता. तो ज्याला कुणाला भेटला त्याच्यावर पेट्रिटच्या चांगुलपणाचा आणि सकारात्मकतेचा प्रभाव पडला. पॅटला बॉक्सिंग करण्याची काहीही गरज नव्हती. तो एका चांगल्या कुटुंबाशी निगडीत होता तसंच उच्च शिक्षित आणि संस्कारी होता. आयुष्य जगण्यासाठी त्याच्याकडे इतरही मार्ग होते. परंतु, त्यानं स्वत:साठी बॉक्सिंगचीच निवड केली होती' असं पॅट्रिटचे प्रमोटर लाऊ डिबेलो यांनी म्हटलंय. 

तर पॅट्रिटची ज्याच्याशी शेवटची मॅच रंगली त्या कॉनवेलही पॅट्रिटच्या निधनानं धक्का बसलाय. 'मी या मुद्यावर शेवटचं वक्तव्य करेन कारण मला माहीत आहे हा किती संवेदनशील विषय आहे. पॅट्रिट तुझ्यासोबत असं काही व्हावं, असं माझ्या मनातही नव्हतं. असं का घडलं? हा प्रश्न मीच मला अनेकदा विचारतोय... मी अनेकदा अश्रूंसहीत प्रार्थना केली. तुमच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढावलाय याबद्दल मी विचारही करू शकत नाही. मी स्वत: बॉक्सिंग सोडण्याचा विचार केला परंतु, कदाचित तुला हे कधीच आवडणार नाही... मी तुझ्यासाठी वर्ल्ड टायटल जिंकेल' अशा शब्दांत कॉनवेलनं आपल्या भावना व्यक्त केल्यात.