Video: 6 विकेट्स 13 कोटींचा आर्थिक फटका अन्...; IPL Salary वरुन भारतीयांकडून ट्रोलिंग

Border Gavaskar Trophy Indian Crowd Teases About IPL: भारताचा अर्ध्याहून अधिक संघ तंबूत परत धाडण्यासाठी जबाबदार असलेल्या या गोलंदाजाची चाहत्यांनी उडवली खिल्ली

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 7, 2024, 01:20 PM IST
Video: 6 विकेट्स 13 कोटींचा आर्थिक फटका अन्...; IPL Salary वरुन भारतीयांकडून ट्रोलिंग title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर झालाय व्हायरल

Border Gavaskar Trophy Indian Crowd Teases About IPL: बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेअंतर्गत भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध अ‍ॅस्ट्रेलियातील अ‍ॅडलेडच्या मैदानावर दुसरी कसोटी खेळत आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा स्टार ठरला तो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क! (Mitchell Starc) या वेगवान गोलंदाजाने भारताच्या सहा फलंदाजांना तंबूतचा रस्ता दाखवत पहिल्या दिवसाच्या पाहिल्या काही तासांमध्येच भारतीय संघाला गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मिचेलच्या कामगिरीमुळेच भारतीय संघ 180 धावांपर्यंतही पोहचू शकला नाही. पहिल्या दोन सत्रांमध्येच भारतीय संघाचे फलंदाज तंबूत परतले. अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सलामीवर यशस्वी जयसवालला बाद करण्यापासूनच स्टार्कने आपल्या घातक गोलंदाजीची झळक दाखवण्यास सुरुवात केली आणि भारतीय फलंदाजीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली.

आयपीएल सॅलरीवरुन उडवली खिल्ली

खेळपट्टीवर चेंडूला मिळणारं वळण, खेळपट्टीमुळे मिळणारी उसळी यासाऱ्या गोष्टींचा पुरेपुर फायदा मिचेल स्टार्क घेताना दिसला. यामुळेच भारतीय फलंदाजांना फार काळ मैदानावर तग धरता आला नाही. एकीकडे स्टार्कच्या धारधार गोलंदाजीला फलंदाजांना उत्तर देता येत नव्हतं तर दुसरीकडे मैदानात सामना पाहण्यासाठी आलेले भारतीय प्रेक्षक मात्र याच गोलंदाजाची फिरकी घेताना दिसले. अ‍ॅडलेडच्या ओव्हर मैदानावर भारतीय चाहत्यांनी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या मिचेल स्टार्कची चांगलीच खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. ही खिल्ली इंडियन प्रिमिअर लिगमध्ये स्टार्कला 2025 च्या सत्रासाठी मिळणार असलेल्या रक्कमेवरुन उडवण्यात आली.

काय घोषणा दिल्या?

मैदानावरील काही प्रेक्षकांनीच शूट केलेल्या व्हिडीओमध्ये स्टार्क सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असतानाच काही चाहते, 'आयपीएल, आयपीएल, स्ट्रॅसी लव्हज आयपीएल!,' अशा घोषणा देताना दिसत आहेत. तसेच अनेकांनी या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाकडे पाहून, 'के-के-आर... के-के-आर..' अशी घोषणाबाजीही केली. 

स्टार्कला बसला मोठा फटका

2024 साली कोलकाता नाईट रायडर्सला तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकवून देण्यात स्टार्कने मोलाचा हातभार लावला. त्यामुळेच त्याला पुढील पर्वासाठी त्याला मोठी बोली लावून नव्या संघात स्थान देण्यात आलं आहे. आयपीएलवरुन चाहते डिवचत असतानाच स्टार्कने मात्र ही आरडाओरड आणि घोषणाबाजी सकारात्मक पद्धतीने घेत थम्बअप करत चाहत्यांना प्रतिसाद दिला. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये स्टार्कला मोठा आर्थिक फटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या गोलंदाजीच्या भात्यात एक उत्तम गोलंदाज असावा म्हणून कोट्यवधी रुपये मोजून स्टार्कला संघात स्थान दिलं आहे. मात्र ही रक्कम 2024 च्या रक्केमेपेक्षा फारच कमी आहे. यावरुनच डिवचताना चाहत्यांनी सीमारेषेजवळ पाणी पित उभा असलेल्या स्टार्कला, 'किती मिळाले?' असा प्रश्न विचारला. 

नेमकी किती रक्कम मिळाली?

स्टार्कला 2024 च्या लिलावमध्ये 24 कोटी 75 लाख रुपये मिळाले. मात्र 2025 च्या पर्वासाठी दिल्लीच्या संघाने स्टार्कला 11 कोटी 75 लाखांना विकत घेतलं आहे. म्हणजेच स्टार्कला 13 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. यावरुनच स्टार्कला भारतीय चाहत्यांनी अ‍ॅडलेडमध्ये डिवचल्याचं दिसून आलं. पाहा हा व्हिडीओ...

दरम्यान, अ‍ॅडलेडच्या कसोटीमध्ये स्टार्कने पहिल्या डावात 14.1 ओव्हरपैकी 2 निर्धावर ओव्हर टाकल्या. त्याने 48 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या.