मुंबई : येत्या 26 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. मात्र 15 वा सिझन सुरु होण्यापूर्वी आयपीएलवर मोठं संकट आल्याचं दिसून येतंय. आयपीएलचे सामने वानखेडे स्टेडियमवर होणार असून स्टेडियमची दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आली आहे. ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आयपीएलवर दहशतवाद्यांचं सावट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वानखेडे स्टेडियमवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. वानखेडे स्टेडियमवर रेकी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान परिसरामध्ये 'नो पार्किंग' लागू करण्यात आलं असून तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
26 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सध्या हाय अलर्टवर आहेत. यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 10 संघांमध्ये तब्बल 74 सामने खेळवले जाणार आहेत. यामधील तब्बल 55 सामने मुंबईत खेळवले जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी वाय पाटील स्टेडिअमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. तर 15 सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत.