बेन स्टोक्स क्लीन बोल्ड? तरीही कसा नॉट आऊट!

बॉल पूर्ण वेगाने विकेटवर आदळला आणि फलंदाज बाद झाला नाही

Updated: Jan 7, 2022, 02:09 PM IST
बेन स्टोक्स क्लीन बोल्ड? तरीही कसा नॉट आऊट! title=

सिडनी : बॉल पूर्ण वेगाने विकेटवर आदळला आणि फलंदाज बाद झाला नाही....क्रिकेटमध्ये असं क्वचितच पाहायला मिळतं. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सिडनीतील चौथ्या कसोटीत सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही असंच काहीसं घडलं. मुख्य म्हणजे असा प्रकार घडल्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. 

दरम्यान ही घटना इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्ससोबत घडली. या घटनेचा स्टोक्सनेही पुरेपूर फायदा घेतला. 

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडची टीम फलंदाजी करत होती. यावेली लंचनंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो क्रीजवर होते. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 31व्या ओव्हरमध्ये स्टोक्स स्ट्राइकवर होता. ओव्हरचा पहिला बॉल ग्रीनने टाकला आणि त्यातच ही आश्चर्यकारक घटना घडली. 

घडलं असं की, स्टोक्सने आतल्या बाजूने येणाऱ्या तो बॉल खेळला नाही. आणि चेंडू ऑफ स्टंपला लागला आणि विकेटच्या मागे गेला. पण हे अंपायर किंवा ऑस्ट्रेलियन फिल्डर्सना समजलं नाही.

कांगारू टीमने कॅच आऊटसाठी जोरदार अपील केलं. यावेळी अंपायर पॉल रायफलनेही बोट वर देखील केलं. पण ही घटना केवळ स्टोक्सलाच माहीत होती. त्यामुळेच त्यांने लगेच रिव्ह्यू मागितला. यानंतर व्हिडीयो पाहिल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसूलं की बॉल स्टोक्सच्या बॅटला लागला नाही तर थेट ऑफ-स्टंपला लागला. गमतीची बाब म्हणजे चेंडू इतक्या वेगाने विकेटवर आदळला पण बेल्स उडाले नाहीत. अखेर व्हिडिओ पाहून अंपायरनेही निर्णय बदलला आणि स्टोक्सला जीवनदान मिळालं. स्वत: स्टोक्सलाही या गोष्टींचं आश्चर्य वाटल आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला.