World Cup 2023 Semifinal India vs New Zealand Big Blow To India: वर्ल्ड कप 2023 मधील सेमीफायनलचा पहिला सामना आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होत आहे. मुंबईमधील वानखेडेच्या मैदानावर भारत आणि 2019 च्या वर्ल्ड कप सेमीफायलनमध्ये भारताला बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धचा सामना रंगणार आहे. या सामन्याची तयारी भारतीय संघाने मागील काही दिवसांपासून सुरु केली आहे. दुसरीकडे उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरी सेमी-फायनल रंगणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मोठा धक्का दिला आहे. आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलच्या एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये गोलंदाज आणि फलंदाजांना फटका बसला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराट कोहलीलाही याचा फटका बसला आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिल पहिल्या स्थानी आहे. मात्र वर्ल्ड कप 2023 मध्ये सध्या तुफान फलंदाजी करत असलेल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीची रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. पहिल्या स्थानी शुभमन गिल आहे. 24 वर्षीय गिलच्या नावावर 832 रेटिंग्स आहेत. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं. बाबर आझम 824 रेटिंग्ससहीत दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहली या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी होती. मात्र आता त्याची घसरण झाली असून तो चौथ्या स्थानी आला आहे. विराटचे रेटिंग्ज 772 इतके आहे. विराटची जागा दक्षिण आफ्रिकेचा विकेट-किपर बॅट्समन क्विंटन डी कॉकने घेतलं आहे. क्विंटन डी कॉकचं रेटिंग 773 इतकं आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताला धक्का बसला आहे. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानी पोहोचलेल्या मोहम्मद सिराजची घसरण झाली आहे. मोहम्मद सिराजने काही दिवसांपूर्वीच आयसीसी ओडीआय बॉलिंग रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं. मात्र आता दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने मोहम्मद सिराजला खाली ढकलत पहिलं स्थान पटकावलं आहे. केशव महाराजचं एकूण रेटिंग 726 इतकं आहे. तर सिराजचं रेटिंग 723 इतकं आहे. केशव महाराजने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरसारी 24.71 इतकी असून इकनॉमी (प्रत्येक ओव्हरला किती धावा देतो) केवळ 4.37 इतकी आहे. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये केशव महाराज तिसऱ्या स्थानी आहे. त्याने पुण्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये 46 धावांमध्ये 4 विकेट्स घेतल्या होत्या.
केशव महाराजने भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये 10 ओव्हरमध्ये केवळ 30 धावा देत एक विकेट घेतली होती. केशव महाराजने फलंदाजीमध्येही चमक दाखवली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये 48 व्या ओव्हरमध्ये त्याने विजयी चौकार लगावला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अवघ्या एका विकेटने दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला होता.
मोहम्मद सिराजने वर्ल्ड कपमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. 9 सामन्यांमध्ये 28.83 च्या सरासरीने 5.20 च्या इकनॉमीने गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजचा नवीन बॉलिंग पार्टनर असलेल्या जसप्रीत बुमराहनेही 2 स्थानांनी उडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह हा चौथ्या स्थानी आहे. त्याचं रेटिंग 687 इतकं आहे. कुलदीप यादवनेही 2 स्थानांनी झेप घेतली आहे. तो पाचव्या स्थानी असून त्याचं रँकिंग 682 इतकं आहे.