मुंबई : विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयवर आरोप करताना विराट कोहली म्हणाला की, मला वनडेचं कर्णधारपद कायम ठेवायचं होतं. मात्र निवड समितीने त्यांचा निर्णय घेतला.
दरम्यान आता एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा मुद्दा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू होता. क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याची बाब बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मनात आधीपासूनच होती.
कोहलीवर असलेला कामाचा ताण पाहता त्याने T20 चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवलं. त्यानंतर विराट कोहलीने पत्रकार परिषदेत खुलासा केला की, त्याने बीसीसीआयला सांगितलं होतं की, त्याला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद कायम ठेवायचं आहे, परंतु तरीही त्याला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आलं.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, बीसीसीआय आणि त्यांनी वैयक्तिकरित्या कोहलीला आपला निर्णय मागे घेण्याची आणि टी-20 कर्णधारपदी कायम राहण्याची विनंती केली होती. परंतु कोहली त्यासाठी सहमत नव्हता.
त्यानंतर कोहलीने सांगितलं की, त्याला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितलं गेलं नाही.
क्रिकट्रॅकरने दिलेल्या वृत्तानुसार, विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याची बाब आधीच बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मनात असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बोर्डाने एकापाठोपाठ एक असे कठीण निर्णय घेतल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्माला पहिला उपकर्णधार बनवण्यात आले होतं, मात्र त्याच्या दुखापतीमुळे ही जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.