BCCI चा दणका; भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इंग्लंडचं एक नाव शर्यतीत, कोण आहेत ते?

Team India : इथं भारतीय संघासाठी प्रशिक्षण म्हणून कोणाची वर्णी लागणार अशा चर्चा रंगत असतानाच तिथं बीसीसीआयनं मात्र याबाबतचा निर्णय घेतल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे.   

सायली पाटील | Updated: Jun 29, 2023, 11:40 AM IST
BCCI चा दणका; भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इंग्लंडचं एक नाव शर्यतीत, कोण आहेत ते? title=
BCCI womens Team Indias New Head Coach latest update

Team India Head Coach : तिथं (ICC) आयसीसीनं आगामी विश्वचषकाच्या (ICC WC 2023) धर्तीवर वेळापत्रक जाहीर केलेलं असतानाच आता यामध्ये सहभागी संघांच्या कामगिरी आणि त्यांचा सध्याचा फॉर्म याबाबतच अनेकजण कयास लावताना दिसत आहेत. दरम्यान, या सर्व चर्चा सुरु असताना आता भारतीय संघाच्या प्रशिक्षपदासाठीचा निर्णय BCCI नं घेतला असून, तीन नावंही निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाची धुरा आता नव्या प्रशिक्षकांच्या हाती सोपवण्यात येणार असून, 30 जून रोजी या पदासाठीच्या निवड प्रक्रियेतील मुलाखतीची फेरी पार पडणार आहे. यासाठी पुढे करण्यात आलेल्या नावांमध्ये अमोल मजुमदार, तुषार अरोठे यांची नावं समाविष्ट आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आता यातून पुढे कोण जातं आणि कोणाच्या हाती महिला क्रिकेट संघाची जबाबदारी सोपवली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जतीन परांजपे, सुलक्षणा नायक आणि अशोक मल्होत्रा यांची क्रिकेट सल्लागार समिती मुंबईत या उमदवारांची मुलाखत घेईल. 

शर्यतीत इंग्लंडमधूनही एक नाव 

भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षपदाच्या शर्यतीत एक नाव, तुषार अरोठे यांचं असून, त्यांनी यापूर्वी भारतीय संघाला प्रशिक्षण दिलं आहे. तर, मजुमदार यांच्याकडे IPL मधील राजस्थानच्या संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघालाही प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इंग्लंडच्या जॉन लुईस यांनीही या पदासाठी अर्ज केल्याचं म्हटलं जात आहे. 

सध्याच्या घडीला रमेश पोवारना संघाच्या प्रशिक्षक पदावरून काढल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली विविध सामन्यांसाठी मैदानात उतरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मुख्य प्रशिक्षक नाहीत. ज्यानंतर यंदाच्याच वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या महिलांच्या टी20 विश्वचषकाच्या वेळी ऋषीकेश कानिटकर या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी संघाची सर्व जबाबदारी सांभाळली होती. 

हेसुद्धा वाचा : World Cup 2023: मोहम्मद सिराजला भारतीय संघात स्थान मिळणं जवळपास निश्चित; वाचा पूर्ण यादी

 

दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षकांची निवड झाल्यानंतर पुरुष निवड समितीच्या सदस्यांसाठीची निवड प्रक्रिया पार पडू शकते, यासाठी अजित आगरकरचं नाव पुढे असल्याचं कळत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून, चेतन शर्मांला बाहेरचा रस्ता दाखवल्यापासून या पदासाठीची जागा रिक्त आहे. त्यासाठीचे अर्जही सध्या मागवण्यात आले असून, त्याबाबतच्या मुलाखती जुलै महिन्यात पार पडणार आहेत. तर, आगामी विष्वचषकाच्या धर्तीवर पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीसुद्धा नव्या चेहऱ्याचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो. थोडक्यात भारताच्या महिला आणि पुरुष संघांमध्ये येत्या काळात प्रशिक्षचांचाच चेहरामोहरा बदलल्यामुळं संघाच्या रणनिती तंत्रातही काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.