मुंबई : संपूर्ण भारत सध्या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा सामना करतोय. दरम्यान कोरोनाच्या या महामारीचा क्रिकेट आणि इतर खेळांवरही परिणाम झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने रणजी, सीके नायडू ट्रॉफी यांसारख्या मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्यात. तर भारतातील सर्वात मोठी लीग आयपीएलला देखील कोरोनाचा फटका सहन करावा लागतोय.
भारतात ज्या वेगाने कोरोनाची प्रकरणं वाढतायत त्यामुळे पुन्हा एकदा बीसीसीआय अडचणीत सापडली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2022 चं घरच्या मैदानांवर आयोजन करणं आता देखील आता अडचणीत येऊ शकते. अशा परिस्थितीत गेल्या दोन सीजनप्रमाणे बीसीसीआयने त्यांच्या 'प्लॅन बी'वर काम करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी इंडियन प्रिमीयर लीग बीसीसीआय दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत आयोजित करण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका वेबसाईटला सांगितलं की, "आम्ही कायम यूएईवर अवलंबून राहू शकत नाही. यासाठीच आम्ही आणखी पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे."
भारताच दक्षिण आफ्रिकेपेक्षा 3 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. जर ब्रॉडकास्टर संध्याकाळी 7.30 वाजता त्यांच्या पसंतीच्या प्राइम स्टार्टवर टिकून राहिले तर, दक्षिण आफ्रिकेत 4 वाजता सामना सुरु होईल. गेल्या काही वर्षांमध्ये, खेळाडूंनी अनेकदा आयपीएलचे सामने रात्री उशिरा संपत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने टीम इंडियासाठी मोठे हॉटेल आणि रिसॉर्ट्सची व्यवस्था केली आहे. मात्र कोरोनाच्या महामारीच्या काळात क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यापासून खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची चिंता निर्माण झाली आहे. खेळाडू बऱ्याच काळापासून बायो-बबलमध्ये राहतायत.
यंदाच्या आयपीएलमध्ये 10 टीम्सचा सहभाग असणार आहे. त्यामुळे 15वा सीजन हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सीजन ठरेल.