टीम इंडियाच्या खेळाडूंना मांस खायचं असेल तर 'या प्रकारचं' मांस खाणं बंधनकारक

बीसीसीआयच्या त्या निर्णयाने नेटिझन्स संतापले असून जोरदार गदारोळ सुरु आहे

Updated: Nov 23, 2021, 05:30 PM IST
टीम इंडियाच्या खेळाडूंना मांस खायचं असेल तर 'या प्रकारचं' मांस खाणं बंधनकारक title=

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत दमदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आता 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज होत आहे. पण त्या आधीच भारतीय क्रिकेट वर्तुळात एक नवा वाद उभा राहिला आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी (Indian Cricket Team) एक नवा डाएट प्लान तयार केला आहे. पण या डाएट प्लानवरुन सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना फक्त हलाल प्रमाणित मांस खाणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरुन सोशल मीडियावर बीसीसीआयवर मोठी टीका होत आहे.

टि्वटर वर #BCCI_Promotes_Halal ट्रेंड होत आहे, ज्यातून भारतीय क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले जात आहेत. वास्तविक बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन डाएट प्लान तयार केल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली होती. क्रिकेटपटूंना या योजनेचं काटेकोरपणे पालन करावे लागणार असून खेळाडूंनी केवळ हलाल मांस खावं असं यात म्हटलं होतं.

एका स्पोर्ट्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंना डुकराचं मांस आणि गोमांस खाण्यासही परवानगीही नसेल. खेळाडूंचा फिटनेस आणि तब्येत लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. जर कोणाला मांस खायचं असेल तर ते फक्त हलाल प्रमाणित मांस खाऊ शकतात, याशिवाय कोणतंही मांस खाऊ शकत नाही असंही नमूद करण्यात आलं आहे.

आगामी क्रिकेट कॅलेंडरमध्ये मोठ्या मालिका आणि आयसीसी स्पर्धांसाठी खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा डाएट प्लान खेळाडूंवर काटेकोरपणे लागू केला जाईल तसंच खेळाडूंचं वजन वाढणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, अशी माहिती आहे.

बायो बबलमध्ये राहिल्याने काही खेळाडूंना सतत क्रिकेट खेळण्यात अडचणी येत आहेत. त्यांना सर्व फॉरमॅटमध्ये आपली उर्जा राखता येत नाहीए, अशा परिस्थितीत खेळाडूंना त्यांच्या आहारात काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. जे खेळाडू मांसाहाराचे शौकीन आहेत त्यांना विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर बीसीसीआयवर ताशेरे
पण यामुळे सोशल मीडियात बीसीसीआयवर हलाल प्रमाणित अन्नाची जाहिरात केल्याचा आरोप होत आहे. भाजप आणि हिंदुत्व संघटनांकडून संबंधित ट्विटर अकाऊंटवरून याबाबत सातत्याने ट्विट केलं जात आहेत. हिंदू आणि शीख क्रिकेटपटूंना हलाल मांस खाण्याची सक्ती का केली जात आहे, असा प्रश्नही विचारला जात आहे.

#BCCI_Promotes_Halal नावाने ट्रेंड
हिंदू संघटनांचा हलाल मांसला विरोध आहे. हलाल प्रमाणित अन्नाद्वारे इस्लामिक कायद्याला प्राधान्य दिले जात असल्याचं त्यांचं म्हणणे आहे. सोबतच हिंदू आणि शीख धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अनेक हिंदू आणि शीख लोक हलाल मांस खात नाहीत. इस्लाममध्ये हलालशिवाय इतर कोणत्याही प्रकारे तयार केलेले मांस खाण्यास बंदी आहे. यावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत.

याबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.