लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यामधले वाद आणखी वाढले आहेत. बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया-११ विरुद्ध जागतिक-११ या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना बोलावलं जाणार नाही, असं वक्तव्य बीसीसीआयकडून करण्यात आलं होतं. या वक्तव्यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआय पाकिस्तानी खेळाडूंबाबत चुकीची आणि भ्रम निर्माण करणारी माहिती देत आहे, असा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे.
पुढच्या वर्षी मार्च महिन्यात बांगलादेश क्रिकेट बोर्ड आशिया-११ आणि जागतिक-११ या टीममध्ये २ टी-२० मॅच होणार आहेत. बांगलादेशचे संस्थापक आणि बंगबंधू या नावाने प्रसिद्ध असलेले शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त या सीरिजचं आयोजन करणार आहे.
आयसीसीने या मॅचना अधिकृत दर्जा दिला आहे. १६ मार्च आणि २० मार्चला या दोन मॅच खेळवल्या जाणार आहेत. पण २०२० सालची पीएसएल २२ मार्चला संपणार आहे. दोन्ही सीरिजची तारीख बदलता येत नसल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना आशिया-११ टीममध्ये सहभागी होता येणार नाही, याबाबत आम्ही बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे निराशा व्यक्त केली आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची दिशाभूल करण्यासाठी सत्याची मोडतोड करुन सांगण्यातं आलं. या गोष्टी दुर्दैवी आहेत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
आशिया-११ टीममध्ये पाकिस्तानी आणि भारतीय खेळाडू एकत्र खेळण्याची वेळच येणार नाही, कारण या सीरिजसाठी पाकिस्तानी खेळाडूंना आमंत्रित केलं जाणार नाही, असं बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज म्हणाले होते.