Tennis Player Fight With Girlfriend During Match What Happend Next Will Shock You: ऑस्ट्रेलियन टेनिसपटू बर्नार्ड टॉमिकने टेनिसचा सामना सुरु असताना अचानक निवृत्ती जाहीर केली. सामन्यादरम्यानच त्याने निवृत्तीची घोषणा करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेच्या सामन्यात खेळत असतानाच बर्नार्डचं कोर्टमध्ये बसलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर वाद झाल्यानंतर त्याने तडकाफडकी निवृत्तीची घोषमा केली. बर्नार्ड टॉमिक 2021 च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर कोणतीही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा खेळलेला नाही. त्याने 2011 च्या विम्बल्डनची उपांत्यफेरी खेळली होती.
एकेकाळी जागतिक टेनिसपटूच्या क्रमवारीमध्ये 17 व्या स्थानापर्यंत झेप घेणारा बर्नार्ड टॉमिक आज 247 व्या क्रमांकावर आहे. तो चॅलेंजर्स सर्किटमध्ये रॅकिंग सुधारण्यासाठी सामने खेळत होता. रँकिंग सुधारुन ग्रॅण्ड स्लॅम खेळण्याचा त्याचा विचार होता. मात्र जागतिक क्रमवारीमध्ये 265 व्या स्थानी असलेल्या जपानच्या युता शिमीझूविरुद्धच्या सामन्यादरम्यान कोर्टवर असतानाच त्याचा प्रेयसीबरोबर वाद झाला. या वादाचा परिणाम इतका झाला की त्याने सामना गमावला. हा सामना अर्कान्सास येथील लिटील रॉक ओपन येथे खेळवला जात होता.
सामन्यातील पहिला सेट बर्नार्ड टॉमिकने 6-1 ने गमावला. बर्नार्ड टॉमिकने त्याला बरं वाटत नसल्याचं सांगत डॉक्टरांनी माझी तपासणी करावी अशी मागणी केली. मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्याने तो पुढे सामना खेळत राहिला. मात्र एका क्षणी त्याचं आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेयसीचा वाद झाला. बर्नार्ड टॉमिक कोर्टवरुन तर त्याची प्रेयसी प्रेक्षकांमध्ये बसून एकमेकांशी वाद घालत होते. बर्नार्ड टॉमिकची प्रेयसी केली हॅनाने तू असा कसा अचानक आजारी पडला असा जाब त्याला प्रेक्षकांच्या स्टॅण्डमधूनच विचारला. यावरुन दोघांमध्ये सर्वांसमोर बाचाबाची झाली.
या दोघांमधील वादाबद्दल बोलताना एटीपी चॅलेंजर्सच्या समालोचकाने, "बर्नार्ड टॉमिक आणि त्याची प्रेयसी वाद घालत राहिले. थोड्या थोड्या वेळाने त्यांच्याच छोटी-मोठी बाचाबाची सुरु होती. बर्नार्डने त्याच्या प्रेयसीला कोर्टमधून सामना सुरु असतानाच 'तुझ्या कोरोना चाचणीचा निकाल सकारात्मक आला आहे का?' असं विचारलं. त्यावर त्याच्या प्रेयसीने, "नाही, ती दोन आठवड्यांपूर्वीची चाचणी होती" असं सांगितलं. आम्ही या भांडणात पडू इच्छित नाही पण हा वाद सर्वांसमोर सुरु होता. हे चाहत्यांसाठी फारसं आशादायक चित्र नाही. कारण चाहते येथे टेनिसचा सामना पाहण्यासाठी आले आहेत. त्यांना ते मिळेल की नाही सध्या सांगता येत नाही," असं म्हणत दोघांवर टीका केली.