मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली पहिली टेस्ट मॅच मेलबर्नमध्ये सुरु आहे. या टेस्टमध्ये भारताची स्थिती भक्कम आहे. दुसऱ्या दिवशी भारतानं ४४३ रनवर डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात २१५/२ अशी करणाऱ्या भारतानं चांगली बॅटिंग केली. चेतेश्वर पुजारानं या सीरिजमधलं त्याचं दुसरं शतक केलं. पुजाराला भारताच्या इतर बॅट्समननीही चांगली साथ दिली. मयंक अग्रवालनं ७६ रन, कर्णधार विराट कोहलीनं ८२ रन, रोहित शर्मानं नाबाद ६३ रन, अजिंक्य रहाणेनं ३४ रन आणि ऋषभ पंतनं ३९ रनची खेळी केली. यामुळे भारताला ४४३ रनचा टप्पा गाठता आला.
या टेस्टमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचं शतक १८ रननी हुकलं. विराटला या मॅचमध्ये शतक करता आलं नसलं, तरी त्यानं राहुल द्रविडचं १६ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं आहे. विराट कोहली एका वर्षात परदेशात सर्वाधिक टेस्ट रन करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. विराटनं या वर्षी टेस्टमध्ये १,१३८ रन केले आहेत. यावर्षी विराटला आणखी एक इनिंग खेळण्याची संधी आहे. हे रेकॉर्ड करण्यासाठी विराटला बरोबर ८२ रनची गरज होती आणि विराट या इनिंगमध्ये ८२ रन करूनच आऊट झाला. याआधी हे रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होतं. द्रविडनं २००२ साली १,१३७ रन केले होते.
वर्षाच्या सुरुवातीच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटनं सर्वाधिक २८६ रन केले होते. त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यातल्या ५ टेस्टमध्ये विराटनं रेकॉर्ड ५९३ रनचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराटला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ३ रन आणि ३४ रन करून आऊट झाला. तर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं शतक झळकावलं. विराटनं पहिल्या इनिंगमध्ये १२३ रनची तर दुसऱ्या इनिंगमध्ये १७ रनची खेळी केली.