'मला तुझी बायको फार आवडते,' भारतीय चाहत्याच्या कमेंटवर पॅट कमिन्सचं भन्नाट उत्तर, म्हणाल 'तिला...'

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने एका भारतीय चाहत्याला दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे. या भारतीय चाहत्याने पॅट कमिन्स आणि त्याच्या पत्नीच्या फोटोवर कमेंट करत मला ती फार आवडते असं म्हटलं होतं.  

शिवराज यादव | Updated: Feb 14, 2024, 11:53 AM IST
'मला तुझी बायको फार आवडते,' भारतीय चाहत्याच्या कमेंटवर पॅट कमिन्सचं भन्नाट उत्तर, म्हणाल 'तिला...' title=

ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) पत्नीवर कमेंट करणाऱ्या एका भारतीय चाहत्याला भन्नाट उत्तर दिलं आहे. पॅट कमिन्सने इंस्टाग्रामला (Instagram) आपली पत्नी बेकी कमिन्ससह एक फोटो शेअर केला होता. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने पॅट कमिन्सने हा फोटो शेअर करत पत्नीला शुभेच्छा दिल्या होत्या. समुद्रकिनारी काढलेल्या या फोटोत दोघेही पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. पॅट कमिन्सने हा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छा देत कमेंट्सचा पाऊस पाडला. पण यामध्ये एका भारतीय चाहत्याच्या कमेंटने पॅट कमिन्सचं लक्ष वेधून घेतलं. 

पॅट कमिन्सने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'सुपर आई, पत्नी आणि माझी व्हॅलेंटाइन, तसंच एक प्रो-सर्फरही. तुला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा'. या फोटोवर कमेंट करताना एका भारतीय चाहत्याने लिहिलं की, 'मी भारतीय आहे आणि माझं तुझ्या पत्नीवर प्रेम आहे'. विशेष म्हणजे यावर पॅट कमिन्सने त्याची दखल घेतली. 'मी तुझा संदेश तिच्यापर्यंत पोहोचवतो', अशी भन्नाट कमेंट त्याने केली. 

पॅट कमिन्सने दिलेलं उत्तर तुफान व्हायरल झालं असून, नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. त्याचं हे उत्तर चर्चेत आहे. 

पॅट कमिन्ससाठी 2023 हे वर्ष फारच चांगलं आहे. याचं कारण याच वर्षात त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप आणि एकदिवसीय वर्ल्डकपचा खिताब जिंकला आहे. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघाचं आव्हान होतं. भारतीय संघ दमदार कामगिरी करत असतानाही या दोन्ही सामन्यात अंतिम क्षणी ढेपाळले आणि ऑस्ट्रेलियाने दोन्ही ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. याशिवाय पॅट कमिन्सने आयसीसी पुरुष क्रिकेटर ऑफ द ईअरचा पुरस्कारही मिळवला. 

हा पुरस्कार स्विकारताना पॅट कमिन्सने भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांचं कौतुक केलं. "माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. हे फार मोठं वर्ष होतं, संघाला चांगलं यश मिळालं. माझ्यासाठी हा सन्मान मिळालं मोठी बाब आहे. मी फार आश्चर्यचकित झालो आहे. वैयक्तिक यशाच्या बाबतीत हा सर्वोच्च सन्मान आहे," अशा भावना पॅट कमिन्सने व्यक्त केल्या होत्या. 

पुढे तो म्हणाला होता की, "विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांच्या कामगिरीत कमालीचं सातत्य आहे. तुम्ही त्यांच्यावर मात करु शकत नाही. संघ अडचणीत असला तर ते काहीतरी मार्ग काढत संघाला विजय मिळवून देतात. त्यांच्यासह हा पुरस्कार मिळणं विशेष बाब आहे".

ऑस्ट्रेलिया संघाने नुकतचं वेस्ट इंडिजविरोधातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. पॅट कमिन्स या संघाचा भाग नव्हता. पण 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरोधातील टी-20 मालिकेत तो खेळताना दिसणार आहे.