मैदानात खेळाडूंना पाणी घेऊन पोहोचले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

क्रिकेटमध्ये खेळाडूंना पाणी देण्यासाठी बहुतेकवेळा १२वा खेळाडू येतो. 

Updated: Oct 25, 2019, 07:35 PM IST
मैदानात खेळाडूंना पाणी घेऊन पोहोचले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान title=

कॅनबेरा : क्रिकेटमध्ये खेळाडूंना पाणी देण्यासाठी बहुतेकवेळा १२वा खेळाडू येतो. पण ऑस्ट्रेलियातली एक मॅच याला अपवाद ठरली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात खेळाडूंसाठी पाणी घेऊन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन पोहोचले. गुरुवारी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया पंतप्रधान एकादश या टीममध्ये सराव सामना झाला.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. वॉटर बॉय पंतप्रधान ऑन ड्युटी, असं म्हणत अनेकांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा फोटो ट्विट केला आहे.

ऑस्ट्रेलिया पंतप्रधान एकादश आणि श्रीलंकेत सुरु असलेल्या मॅचवेळी ऑस्ट्रेलियाच्या डेनियल फालिंसने श्रीलंकेच्या दासुन सनाकाची विकेट घेतली. यानंतर स्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी मैदानात पाणी आणि कोल्डड्रिंक घेऊन आले.

श्रीलंकेची टीम ही सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये श्रीलंका ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार आहे. यातली पहिली टी-२० रविवारी ऍडलेडमध्ये खेळवली जाणार आहे. त्याआधी दोन्ही टीममध्ये हा सराव सामना झाला.