"मी मुसलमान पण माझ्या तालमीचं नाव छत्रपती शिवराय संकुल, कुस्तीला जातीय रंग देऊ नका"

सोशल मीडियावरही सिकंदरच्या समर्थनार्थ अनेक स्टेटस झळकताना दिसले. अशातच यावर कुस्ती सम्राट म्हणून ओळखले जाणारे अस्लम काझी यांनी पार्शलिटी झाल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी कुस्तीला जातीय रंग देऊ नका असं सुनावलं आहे.

Updated: Jan 21, 2023, 09:52 PM IST
"मी मुसलमान पण माझ्या तालमीचं नाव छत्रपती शिवराय संकुल, कुस्तीला जातीय रंग देऊ नका" title=

Aslam Kazi on Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पराभूत झालेल्या सिकंदर शेखची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. सिकंदरचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता त्यामध्ये पंचांनी दिलेल्या निर्णयावरून वाद झाला. यावर महाराष्ट्रातून अनेक कुस्ती  शौकिनांनी नाराजी व्यक्त करत सिकंदरवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावरही सिकंदरच्या समर्थनार्थ अनेक स्टेटस झळकताना दिसले. अशातच यावर कुस्ती सम्राट म्हणून ओळखले जाणारे अस्लम काझी यांनी पार्शलिटी झाल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी कुस्तीला जातीय रंग देऊ नका असं सुनावलं आहे. 

मी स्वत: मुसलमान असून गेल्या 20 वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे. मला ज्याने तालीम बांधून दिली तो व्यक्ती मारवाडी समाजाचा आणि माझ्या तालमीचं नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कारण इथे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असतो. कुस्ती हा कोणत्या जातीचा खेळ नाही त्यामुळे अशा प्रकरणांना जातीय रंग देऊ नका, असं आवाहन अस्लम काझी यांनी केलं आहे. 

सिकंदर शेख प्रकरणामध्ये जातीय रंग दिला जात असून पैलवान हीच आमचीज जात असते. अस्लम काझी असो नाहीतर सिकंदर यांच्यावर कोणती धर्म नाहीतर सर्व जातीचे लोक प्रेम करतात. रोज बजरंग बलीचं नाव घेऊन आम्ही पाया पडतो आणि त्याची सेवा करत आखाड्यात उतरत असल्याचं अस्लम काझी म्हणाले.

सिकंदरच्या वादग्रस्त कुस्तीबाबत काय म्हणाले अस्लम काझी?
मी याबाबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पंचांशी बोललो तर त्यांचंदेखील म्हणणं आहे की महेंद्रला 2 तर सिकंदरला 1 गुण द्यायला हवा होता, त्यामुळे दोन गुणांची पार्शलिटी झाली. पण ती जाणीवपूर्वक नाही तर अनावधानाने किंवा गडबडीत झालेली चूक असल्याचं अस्लम काझी यांनी म्हटलं आहे.