Asia Cup 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंका दोघांचा स्कोअर 252 असताना लंका कशी काय जिंकली?

Asia Cup 2023 Why Sri Lanka Have Target Of 252 Runs: पाकिस्तानने आपल्या नियोजित 42 ओव्हरमध्ये 252 धावा केलेल्या असतानाही श्रीलंकेला विजयासाठी 253 धावांऐवजी 252 धावांचं लक्ष देण्यात आलं. पण असं का?

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 15, 2023, 09:23 AM IST
Asia Cup 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंका दोघांचा स्कोअर 252 असताना लंका कशी काय जिंकली? title=
पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या सामन्याला निकाल शेवटच्या चेंडूवर लागला

Asia Cup 2023 Why Sri Lanka Have Target Of 252 Runs: आशिया चषक 2023 च्या करो या मरोच्या सुपर-4 सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अत्यंत रोमहर्षक सामन्यामध्ये 252 धावांचं लक्ष गाठत श्रीलंकेने हा विजय मिळवला. मात्र तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? पाकिस्ताननेही 252 धावाच केल्या होत्या. सामान्यपणे जितक्या धावा पहिला संघ करतो त्यापेक्षा एक धाव अधिक करणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जातं. मात्र गुरुवारी झालेल्या श्रीलंका-पाकिस्तान सामन्यामध्ये असं झालं नाही. दोन्ही संघांची धावसंख्या समान असताना श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. पण असं का घडलं तुम्हाला ठाऊक आहे का?

उशीरा सुरु झाला सामना

श्रीलंका आणि पाकिस्तानदरम्यानचा हा सामना कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला. सामन्याचा सुरुवातच पावसामुळे नियोजित वेळेपेक्षा उशिराने झाली. त्यामुळे दोन्ही संघ प्रत्येकी 45 ओव्हर खेळतील असं निश्चित करण्यात आलं. मात्र पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत असतानाच पुन्हा पाऊस पडला. त्यामुळे सामन्याच्या 3 ओव्हर कमी करण्यात आल्या आणि दोन्ही संघ प्रत्येकी 42 ओव्हर खेळतील असं निश्चित करण्यात आलं. पावसाच्या या ब्रेकआधी पाकिस्तानने 27.4 ओव्हरमध्ये 4.7 च्या सरासरीने 130 धावा केल्या होत्या. पावसाच्या ब्रेकनंतर मैदानावर उतरल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक खेळ करत उर्वरीत 14.2 ओव्हरमध्ये 8.60 च्या सरासरीने 122 धावा केल्या. पाकिस्तानची एकूण धावसंख्या 252 पर्यंत पोहोचली.

...म्हणून 252 चं लक्ष्य

42 ओव्हरमध्ये पाकिस्तानने 252 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळेच डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पाकिस्तानने 42 ओव्हरमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात 252 धावा केल्याने आकडेमोड करुन लक्ष्य निश्चित करण्यात आलं. या डकवर्थ लुईसच्या नियमानुसारच श्रीलंकेला 253 म्हणजे पाकिस्तानच्या धावसंख्येपेक्षा 1 धावा अधिक असलेलं लक्ष्य देण्याऐवजी अगदी पाकिस्तानच्या धावसंख्येइतकं म्हणजे 252 चं लक्ष्य देण्यात आलं. सामान्य परिस्थितीमध्ये श्रीलंकेला 253 धावांची गरज असती. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना असलंकाने संयम राखत चेंडू हळूच गॅपमधून टोलवत 2 धावा काढल्या आणि श्रीलंकेला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

नक्की वाचा >> 'यापेक्षा Final ला पाकिस्तान परवडला असता'; 'हे' आकडे पाहून रोहित शर्माही हेच म्हणेल

आता फायनल भारताविरुद्ध

शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. 'सुपर-4' फेरीमधील या सामन्यात विजय मिळवल्याने श्रीलंकने संघाने 11 व्या वेळा आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकन संघ हा आशिया चषक स्पर्धेचा विद्यमान विजेता असून जेतेपद कायम ठेवण्यासाठी हा संघ आता भारताविरुद्ध 2 हात करणार आहे.