Shaheen Shah Afridi Yorker Video: आशिया चषक 2023 ला बुधवारी म्हणजेच 30 ऑगस्टपासून सुरुवात झाली. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेशचा समावेश असलेल्या या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तानच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने नेपाळला 238 धावांनी पराभूत केलं. या सामन्यामध्ये पाकिस्तानी फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना भारताबरोबर 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. पाकिस्तानची नेपाळविरुद्धची कामगिरी पाहता भारतीयांची चिंता वाढणं सहाजिक आहे. मात्र त्यातही भारताच्या पहिल्या फळीतील फलंदाजांची चिंता वाढवणारी एक बाबही पाहिल्या सामन्यातून समोर आली आहे. ही बाब म्हणजे पाकिस्तानचा वेगवान डावखुरा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी!
शाहीन शाह आफ्रिदीने नेपाळविरुद्धच्या सामन्यात केलेली गोलंदाजी क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी होती यात शंका नाही. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार बाबर आझमने 151 धावांची खेळी केली. हे बाबरचं एकदिवसीय क्रिकेटमधील 19 वं शतक ठरलं. इफ्तिकार अहमदने नाबाद 109 धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपलं पहिलं शतक झळकावलं. पाकिस्तानी संघाने या सामन्यामध्ये 342 धावांचा डोंगर उभा केला. 343 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला नेपाळचा संघ अर्ध्या ओव्हर्सही खेळू शकला नाही. नेपाळचा संपूर्ण संघ 23.4 ओव्हरमध्ये 104 धावांवर तंबूत परतला. नेपाळला स्वस्तात तंबूत पाठवण्यात शाहीन शाह आफ्रिदीने मोलाचं योगदान दिलं.
शाहीन शाह आफ्रिदीने 5 ओव्हरमध्ये 27 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या शादाब खानने सर्वाधिक म्हणजे 4 गड्यांना तांबूत पाठवलं. तर दुसरीकडे शाहीन शाह आफ्रिदीचे चेंडूही आग ओकत असल्याप्रमाणे भासत होते. नेपाळच्या खेळाडूंना या दोघांच्या गोलंदाजीदरम्यान खेळपट्टीवर कसं टिकून रहावं असा प्रश्न पडल्याचं त्यांच्या देहबोलीवरुनच समजत होतं. शाहीनने नेहमीप्रमाणे आपल्या पहिल्या षटकामध्येच विकेट घेतली. नेपाळच्या संघाच्या फलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर चौथ्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीने सलामीवीर कुशल भुरटेलला तंबूत पाठवलं. त्यानंतर शाहीनच्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंचा शिकार ठरला नेपाळच्या कर्णधार रोहित पुडैल!
रोहित पुडैलला टाकलेला चेंडू हवेतच वळण घेत गेला अन् थेट पॅडला लागला. रोहित हा चेंडू पाहून गोंधळून गेला आणि काही करण्याच्या आधीच चेंडूने पॅडचा वेध घेतला होता. शाहीनने टाकलेला हा चेंडू मिडल स्टम्पवर होता. मात्र रोहितला चेंडू ऑफ स्टम्पव टाकण्यात आल्यासारखं वाटलं आणि तो गोंधळून गेला आणि जागेवरच उभा राहिला. मिडल स्टम्पवरील हा यॉर्कर थेट रोहितच्या पॅडला लागला अन् शाहीनने जोरात अपिल केली. पंचांनी रोहितला बाद घोषित केलं. रोहित एलबीडब्ल्यू झाल्याने 2 चेंडूंमध्ये शाहीनला 2 विकेट्स मिळाल्या.
Pace & swing
Pakistan's premier pacers have been on the money from the get go, restricting Nepal with quick and lethal strikes!Will Nepal put up a spirited fight?
Tune-in to #AsiaCupOnStar, LIVE NOW on Star Sports Network & Disney+ Hotstar#PAKvNEP #Cricket pic.twitter.com/avl2nwbybw
— Star Sports (@StarSportsIndia) August 30, 2023
पाकिस्तान वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी विरुद्ध भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी कशी असेल यावरच सामन्याचं भवितव्य ठरणार आहे, असं मत ऑस्ट्रेलियन विश्वविजेत्या संघातील माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता भारतीय फलंदाज आणि खास करुन रोहित शर्मा, शुभमन गील आणि विराट कोहली ही आघाडीची फळी कसं खेळून काढते हे पाहण्यासारखं असेल यात शंका नाही.