Asia Cup मध्ये नवा वाद: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने थेट जय शाहांकडे मागितले पैसे; कारण...

Pakistan Cricket Board Demands Money: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट जय शाह यांना ई-मेल केला असून यामधून त्यांनी पैशांची मागणी केली आहे. अनेक सामने श्रीलंकेत आयोजित केले जात असतानाही ही मागणी कशी करण्यात आली पाहा

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 7, 2023, 07:10 AM IST
Asia Cup मध्ये नवा वाद: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने थेट जय शाहांकडे मागितले पैसे; कारण... title=
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने ईमेलवरुन केली मागणी

Pakistan Cricket Board Demands Money: आशिया चषक 2023 मध्ये नवीन वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचं आयोजन करणार होता. मात्र भारतीय क्रिकेट बोर्डाने मागील वर्षीच भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं स्पष्ट केलं. आशियाई क्रिकेट परिषदेने या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी पाकिस्तानबरोबर श्रीलंकेचाही समावेश केला. यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं होतं. पाकिस्तानमध्ये या स्पर्धेतील केवळ 4 सामने खेळवले जाणार असून उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होत आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने यावर आक्षेप घेतला. आशिया चषकाच्या यजमान पदावरुन वाद निर्माण झाल्यानंतरही भारत आपला संघ पाकिस्तानला पाठवणार नाही यावर ठाम राहिला. 

जय शाह यांना केला ई-मेल

आशियाई क्रिकेट परिषदेने इतर देशांची मागणी लक्षात घेत आशिया चषकाचं आयोजन पाकिस्तानबरोबर श्रीलंकेत करण्यास सहमती दर्शवली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ही गोष्ट फारशी पसंत पडली नाही. मात्र त्यांच्या या विरोधाचा काहीच फायदा झाला नाही. आता पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जका अशरफ यांनी केलेल्या एका कृतीची सध्या तुफान चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी आशियाई क्रिकेट परिषदेला भारत आणि नेपाळदरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्याची तिकीटविक्री कमी झाल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडे ही पैशांची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेला एक ईमेल पाठवला असून ज्यामध्ये तिकीटविक्री कमी झाल्याने जे नुसान झालं आहे त्याचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

नेमकं प्रकरण काय

पाकिस्तानला आशिया चषक 2023 चं आयोजन करण्यासाठी यजमान पदाचा मान देण्यात आला होता. या मालिकेचे मूळ आयोजक पाकिस्तानच आहे. मात्र सामने श्रीलंकेत खेळवले जात आहेत. त्यामुळे श्रीलंकेतील सामन्यांच्या तिकीट विक्रीतील ठराविक टक्केवारी पाकिस्तानला देण्यात येणार आहे. श्रीलंकेमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने प्रेक्षकांनी सामन्यांकडे पाठ फिरवली आहे आणि तिकीट विक्री कमी झाली आहे. दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तानमधील सामन्यांसाठी अपेक्षित गर्दी होत नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

इतर अधिकाऱ्यांनीही केले आरोप

पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील अन्य अधिकाऱ्यांनीही अनेकदा श्रीलंकेमध्ये पावसाचा कालावधी असल्याने स्पर्धा पाकिस्तानमध्ये किंवा अगदी युएईमध्ये आयोजित केली जावी अशी मागणी केल्याचं म्हटलं आहे. मात्र जय शाह यांनी या मागणीकडे दूर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र जय शाह यांनी आर्थिक आणि सुरक्षेसंदर्भातील बाबींचा उल्लेख करत पाकिस्तानचा पर्याय फेटाळल्याचं म्हटलं आहे.