Asia Cup Final: विराट अंतिम सामन्यात ठरणार अपयशी? 20 वर्षांच्या खेळाडूची घेतलीये धास्ती

Asia Cup 2023 Final Virat Kohli: भारताने पाकिस्तानला पराभूत करुन अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून श्रीलंकेने पाकिस्तानलाच 'करो या मरो' सामन्यात धूळ चारुन अंतिम सामना गाठला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 16, 2023, 04:50 PM IST
Asia Cup Final: विराट अंतिम सामन्यात ठरणार अपयशी? 20 वर्षांच्या खेळाडूची घेतलीये धास्ती title=
17 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळवला जाणार सामना

Asia Cup 2023 Final Virat Kohli: आशिया चषक स्पर्धेचा चषक यंदा विद्यमान विजेता असलेल्या श्रीलंकेकडेच राहणार की भारत तो जिंकणार हे स्पष्ट होईल. 17 सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी भारत आणि श्रीलंकेदरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान अंतिम सामना होईल अशी दोन्ही देशाच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र 'करो या मरो'च्या 'सुपर-4' फेरीच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करुन सलग दुसऱ्यांचा आशिया चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आता 12 वर्षांनंतर आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या 'सुपर-4'च्या फेरीमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना लगाम घातली. विराट कोहलीसारख्या पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणाऱ्या खेळाडूलाही श्रीलंकेनं अगदी थोडक्यात गुंडाळलं. मात्र आता अंतिम सामन्याच्या आधीही आकडेवारी विराटच्या बाजूने दिसत नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांची चिंता वाढली आहे.

कोहली समोर अडचणी

श्रीलंका आणि भारतादरम्यान कोलंबोच्या मैदानावर झालेल्या 'सुपर-4'च्या फेरीचा सामना झाला. या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांना श्रीलंकन फिरकी गोलंदाजांनी गुंडाळलं. भारतीय संघाला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आल्या नाहीत. श्रीलंकेचा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने भारतीय संघातील तब्बल 5 खेळाडूंना बाद केलं. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल या भारताच्या सलामीवीरांचा समावेश होता. त्यानंतर याच 20 वर्षाच्या फिरकीपटूने के. एल. राहुल आणि हार्दिक पंड्यासारख्या अनुभवी खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. आता अंतिम सामन्यामध्येही वेल्लालागे हा विराट कोहली समोर अडचणी निर्माण करु शकतं असं चित्र दिसत आहे. बरं हा केवळ अंदाज नाही तर विराट कोहलीचा डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविरोधातील कामगिरीच सांगत आहे. विराटच्या कामगिरीची आकडेवारी पहिल्यास वेल्लालागे नक्कीच विराटला अडचणीत आणेल असं सध्या तरी दिसत आहे.

विराटची चिंतेत टाकणारी आकडेवारी

दुनिथ वेल्लालागेने विराट-रोहितच नाही तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसारख्या आयसीसी रँकिंगमधील पहिल्या क्रमाकांच्या फलंदाजालाही आपल्या फिरकीत गुंडाळलं आहे. विराट कोहली डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांसमोर गोंधळतो. विराट मागील 11 डावांपैकी 9 डावांमध्ये डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाविरुद्ध खेळताना बाद झाला आहे. विराटने डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविरोधात 13.04 च्या सरासरीने केवळ 121 धावा केल्या आहेत. त्यामुळेच वेल्लालागे हा विराटसमोर अंतिम सामन्यात मोठं आव्हान निर्माण करु शकतो असं सांगितलं जात आहे.