जो रूटचा नवा विक्रम, पाकिस्तानी फलंदाजाचा रेकॉर्ड धोक्यात

जो रूटचा धडाका कायम! या पाकिस्तान दिग्गजाच्या विक्रमावर डोळा

Updated: Dec 11, 2021, 07:43 PM IST
 जो रूटचा नवा विक्रम, पाकिस्तानी फलंदाजाचा रेकॉर्ड धोक्यात  title=

मुंबई: सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना झाला आहे. ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तर देताना कर्णधार जो रूटने शानदार अर्धशतक झळकावलं. यासह इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नवा विक्रम रचला आहे. 

कर्णधार जो रुट इंग्लंडकडून एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 2021 मध्ये आतापर्यंत त्याने 25 डावांमध्ये 6 शतके आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 1541 धावा केल्या आहेत. रूटने देशबांधव मायकेल वॉनचा विक्रम मोडला. 

वॉनने 2002 मध्ये 1481 धावा केल्या होत्या. याशिवाय रूटने स्टीव्ह स्मिथ (1474) आणि वीरेंद्र सेहवाग (1462) यांनाही मागे टाकलं आहे. त्यामुळे जो रूटचं जगभरात कौतुक होत आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफच्या नावावर आहे. युसूफने 2006 मध्ये 1788 धावा केल्या होत्या. या यादीत दुसरे स्थान वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर व्हिव्ह रिचर्ड्सचे आहे. 

जर रूटने यावर्षी आणखी 247 धावा केल्या तर तो पाकिस्तानच्या माजी खेळाडू मोहम्मद युसूफला मागे टाकू शकतो असा कयास आहे. 1976 मध्ये वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटर सर विव रिचर्ड्स यांनी 1710 धावा केल्या होत्या. 

या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथही तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एका वर्षात 1656 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार स्मिथने 2008 मध्ये हा विक्रम केला होता. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क असून त्याने 2012 मध्ये 1595 धावा केल्या होत्या.

जो रूटच्या विक्रमी खेळीमुळे इंग्लंड संघाला उभारी मिळाली. जो रूटने एशेज सीरिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात तुफान फलंदाजी केली. त्याची फलंदाजी पाहून गोलंदाजांना घाम फुटायचा बाकी होता. जो रुटच्या या विक्रमांचं खूप कौतुक होत आहे.