आगामी टी-२० वर्ल्डकप २०२० च्या तारखा जाहीर

विशेष म्हणजे २०२० साली महिला आणि पुरुषांच्या वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले आहे.

Updated: Jan 29, 2019, 12:43 PM IST
आगामी टी-२० वर्ल्डकप २०२० च्या तारखा जाहीर   title=

दुबई : क्रिकेटमधील टी-२० या झटपट प्रकारातील वर्ल्डकप पुढील वर्षात म्हणजेच २०२० साली होणार आहे. या टी-२० वर्ल्ड कप मॅचचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०२० साली महिला आणि पुरुषांच्या वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले आहे.

आयसीसीनुसार महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २१ जानेवारी ते ८ मार्च २०२० दरम्यान होणार आहे. आयसीसीच्या महिला जागतिक संघांपैकी पहिल्या दहा संघांचा या वर्ल्डकपमध्ये सहभाग असणार आहे. यास्पर्धेत एकूण २३ सामने खेळले जाणार आहेत. 

महिला संघाचे दोन गट

टी-२० वर्ल्डकप सामन्यांसाठी आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठ क्रमांकावर असलेल्या संघाची दोन गटांत विभागणी केली आहे. तर ९ ते १२ क्रमांकावर असलेल्या संघाना या वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी सामन्यात विजय अनिर्वाय असणार आहे. या मॅच  ९ आणि १० व्या क्रमांकासाठी मॅच होतील. या मॅच मध्ये जे दोन संघ विजयी होतील त्यांना अंतिम १० साठी प्रवेश मिळेल.

गट अ : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, श्रीलंका, संभावित विजयी संघ १

गट ब :  इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, संभावित विजयी संघ २ 

पुरुष वर्ल्डकप २०२०

महिला टी-२० वर्ल्डकपची सांगता झाल्यावर पुरुष टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. पुरुष टी-२० वर्ल्डकपच्या मॅच १८  ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० या काळात होणार आहेत.  पुरुष टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकूण ४५ मॅच खेळल्या जाणार आहेत. पुरुष टी -२० वर्ल्डकपच्या अंतिम १२ मॅचसाठीचा पहिला सामना हा यजमान ऑस्ट्रेलिया आणि टी-२० च्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. तर भारतीय संघ आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत खेळणार आहे. हा सामना २४ ऑक्टोबर २०२० रोजी खेळला जाणार आहे. 

पुरुष अंतिम १२ संघ

वर्ल्डकप सामने हे फेरीत होतात. ज्या संघांचा ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या आठ संघामध्ये समावेश होता, त्या संघाना टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम -१२ साठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. तर उर्वरित चार संघांची निवड ही सामन्यांद्वारे केली जाईल. या सामन्यांमध्ये ज्या चार संघाचा विजय होईल, त्या संघांना अंतिम-१२ मध्ये प्रवेश मिळेल. 

दोन गटांत विभागणी

पुरुष  टी-२० वर्ल्डकपसाठी १२ संघाना दोन गटांमध्ये विभाजित केले आहे. 

अ गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड तसेच अंतिम १२ साठी सामन्यातून जिकंणाऱ्या दोन विजयी संभावित संघाचा या गटात समावेश केला जाणार.

तसेच ब गटामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि अंतिम १२ साठी सामन्यातून जिकंणाऱ्या दोन संभावित संघाचा या गटात समावेश केला जाणार.

 

महिला आणि पुरुष वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे आयोजन हे मेलबर्न क्रिकेट मैदानावर केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. महिला आणि पुरुष वर्ल्ड टी-२० मॅच ऑस्ट्रेलियातील आठ शहरांतील १३ ठिकाणी होणार आहेत.