कोहली-कुंबळे वादावर अखेर द्रविड बोलला

भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये झालेल्या वादावर अखेर राहुल द्रविड यानं मौन सोडलं आहे. 

Updated: Oct 29, 2017, 09:04 PM IST
कोहली-कुंबळे वादावर अखेर द्रविड बोलला  title=

मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये झालेल्या वादावर अखेर राहुल द्रविड यानं मौन सोडलं आहे. कोहली आणि कुंबळेमधला हा वाद भारतीय क्रिकेटसाठी दुर्दैवी होता, अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडनं एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

अनिल कुंबळेसोबत जे झालं ते दुर्दैवी आणि अपमानास्पद होतं, असं राहुल द्रविड म्हणाला आहे. कुंबळेसोबत जे झालं ते योग्य नव्हतं. बंद दरवाज्याआड काय होतं याबाबत मी भाष्य करणार नाही. पण एवढ नक्की म्हणीन की अनिल कुंबळेसारख्या महान व्यक्तीसोबत जे झालं ते दुर्दैवी आहे, असं म्हणत द्रविडनं विराटचे कान टोचलेत.

विराट कोहली आणि अनिल कुंबळेमधल्या वादाला या वर्षी झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजपासून सुरुवात झाल्याचं बोललं जातं. कुलदीप यादववरून या दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये कुलदीप यादवला टीममध्ये घेण्यासाठी कुंबळे आग्रही होता, पण विराट कोहलीचा याला विरोध होता. अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये कुलदीपला संधी मिळाली. या संधीचं सोनं करत कुलदीप यादवनं ४ विकेट घेतल्या. कुलदीप यादव आता भारतीय टीमच्या टेस्ट, वनडे आणि टी-20 चा महत्त्वाचा हिस्सा आहे.

त्यानंतर जुनमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यावर अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. विराट कोहलीला माझ्या शैलीविषयी आक्षेप असल्यामुळे मी प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत असल्याचं अनिल कुंबळेनं ट्विटरवर सांगितलं होतं. यानंतर रवी शास्त्रीची भारताचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

अनिल कुंबळे प्रशिक्षक असताना भारतानं लागोपाठ ५ टेस्ट सीरिज जिंकल्या होत्या. तसंच भारत टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे प्रशिक्षक असतानाच पोहोचला होता. अनिल कुंबळेनं टेस्टमध्ये ६१९ आणि वनडेमध्ये ३३७ विकेट घेतल्या होत्या.