तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तानचा संघ T20 World Cup खेळणार का?

लिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे. या देशात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांचे राज्य सुरू आहे. 

Updated: Oct 10, 2021, 09:05 PM IST
तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तानचा संघ T20 World Cup खेळणार का? title=

मुंबई : तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे. या देशात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांचे राज्य सुरू आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्व नियमित कामकाज ठप्प झाले आहे. त्याचा क्रिकेटच्या खेळावरही मोठा परिणाम झाला आहे आणि यामुळे अफगाणिस्तान संघ या वर्षी टी-20 विश्वचषकात सहभागी होईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) कार्यवाहक सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी रविवारी स्पष्टीकरण दिले की, टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा सहभाग धोक्यात नाही, परंतु ते म्हणाले की, संकटग्रस्त देशात शासन बदलल्यानंतर गोष्टी कशा उलगडतात यावर नजर ठेवली जाईल. अफगाणिस्तान संघाने देशात सुरू असलेल्या गोंधळादरम्यान तालिबानच्या झेंड्याखाली खेळण्याचा निर्णय घेतला तर आयसीसी त्याला सहभागी होण्यापासून रोखू शकते, असे वृत्त होते.

अलार्डिस म्हणाले, 'तो आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य आहे आणि संघ सध्या स्पर्धेची (विश्वचषक) तयारी करत आहे आणि गट टप्प्यात खेळेल. त्यांच्या सहभागाची प्रक्रिया सामान्यपणे सुरू आहे. तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेटमध्येही बदल करण्यात आले. गेल्या महिन्यात हसीद शिनवारीच्या जागी नसीब झाद्रान खानची क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

अलार्डिस म्हणाले, “ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये सत्ता बदल झाल्यापासून आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सतत संपर्कात आहोत. सदस्य मंडळांच्या माध्यमातून त्या देशात क्रिकेटला प्रोत्साहन देणे हे आमचे प्राधान्य आहे. तेथील गोष्टी कशा प्रगती करतात हे आम्ही पाहत आहोत. अफगाणिस्तान आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य आहे. टी-20 विश्वचषकात त्याला गट दोनमध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यात भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड सारखे संघ देखील आहेत.