एकही रन-विकेट नाही तरी रशीदच्या नावावर अनोखा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला.

Updated: Aug 13, 2018, 03:52 PM IST
एकही रन-विकेट नाही तरी रशीदच्या नावावर अनोखा विक्रम title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. इनिंग आणि १५९ रननी भारताला हार पत्करावी लागली. याचबरोबर ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर पडला आहे. चौथ्या दिवशी जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडनं जबरदस्त बॉलिंग करत भारतीय बॅट्समनची भंबेरी उडवली. अंडरसननं २३ रन देऊन ४ विकेट तर ब्रॉडनं ४४ रन देऊन ४ विकेट घेतल्या. दुसऱ्या इनिंगप्रमाणेच पहिल्या इनिंगमध्येही इंग्लंडच्या फास्ट बॉलरपुढेच भारतीय बॅट्समननी लोटांगण घातलं. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १०७ रनवर तर दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाला.

लॉर्ड्सच्या मैदानात १०० विकेट पूर्ण करण्याचा रेकॉर्ड जेम्स अंडरसननं या मॅचमध्ये केला आहे. हा विक्रम करणारा अंडरसन पहिलाच फास्ट बॉलर तर दुसरा बॉलर ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरननंही असंच रेकॉर्ड केलं होतं. मुरलीधरननं कोलंबो, गेल आणि केंडी या तीनही मैदानांवर प्रत्येकी १०० विकेट घेतल्या आहेत.

जेम्स अंडरसनबरोबरच इंग्लंडचा आणखी एक बॉलर आदिल रशीदच्या नावावरही अनोखा विक्रम झाला आहे. इंग्लंडच्या फास्ट बॉलरनीच सगळं काम केल्यामुळे आदिल रशिदला बॉलिंग मिळाली नाही. तसंच त्याला बॅटिंगलाही उतरावं लागलं नाही. या मॅचमध्ये रशिदनं एकही कॅच पकडला नाही आणि रन आऊटही केला नाही. संपूर्ण मॅचमध्ये काहीही योगदान न देणारा तो १४ वा खेळाडू ठरला आहे. १३ वर्षानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूनं हे रेकॉर्ड केलं आहे. याआधी २००५ साली गॅरेथ बेटीनं बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये हे रेकॉर्ड केलं होतं. ही मॅचही लॉर्ड्सवरच झाली होती. या मॅचमध्ये इंग्लंडनं बांगलादेशचा इनिंग आणि २६१ रननी पराभव केला होता.