दिल्ली क्रिकेट असोसिएनशच्या बैठकीत जोरदार राडा

भाजपचे आमदार ओपी शर्मा यांनादेखील मारहाण झाल्याचे समजते.

Updated: Dec 29, 2019, 10:16 PM IST
दिल्ली क्रिकेट असोसिएनशच्या बैठकीत जोरदार राडा title=

नवी दिल्ली: दिल्ली क्रिकेट असोसिएनशच्या (DDCA) रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला. न्यायमूर्ती (निवृत्त) बदर दुरेझ अहमद यांना पदावरून हटवल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. यावेळी असोसिएनशच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला. सुरुवातीला यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, हा वाद विकोपाला गेल्यानंतर शाब्दिक चकमकीचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी भाजपचे आमदार ओपी शर्मा यांनादेखील मारहाण झाल्याचे समजते. 

या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये 'डीडीसीए'चे सहसचिव रंजन मनचंदा अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर हाणामारी करताना दिसत आहेत. यामुळे DDCA ची चांगलीच नाचक्की होत आहे. 

अनेक माजी क्रिकेटपटूंनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. 

यापूर्वी DDCA वर अरुण जेटली यांची चांगली पकड होती. मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर संघटनेत अंतर्गत राजकारणाला ऊत आला. यामुळे रजत शर्मा यांनीही DDCAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.