मुंबई : टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावर आधारित '83' हा सिनेमा (83 Movie) शुक्रवारी 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला. कपिल देव (Kapil Dev) हे वर्ल्ड कप 1983 च्या विजयाचे नायक होते. या 83 सिनेमात अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेत आहे. तसेच या सिनेमात पंकज त्रिपाठीची (Pankaj Tripathi) भूमिकाही महत्त्वाची आहे. पंकज त्रिपाठीने सिनेमात टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक मान सिंह (Man Singh) यांची भूमिका साकारली आहे. मान सिंह यांनी टीम इंडियाला इतिहास रचताना जवळून पाहिलं होतं. (83 movie world cup 1983 team india man singh his forced to editor of Wisden Cricket Monthly David Frith eat a piece of paper)
या लेखाच्या माध्यामातून आपण मान सिंह बद्दल अगदी कमी लोकांना माहिती असलेला किस्सा जाणून घेणार आहोत. मान सिंह यांनी टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर एका मासिकाच्या संपादकाला पत्र लिहून त्याने सांगितलेल्या शब्दांची आठवण करुन दिली होती.
या पत्रकाराने टीम इंडियाच्या 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये जिंकण्याच्या शक्यता नाहीच्या बरोबर असल्याच म्हंटलं होतं.
पत्रात काय म्हंटलं होतं?
पत्रकाराने वर्ल्ड कप 1983 स्पर्धेदरम्यान टीम इंडियाला कमीपणा दाखवला होता. डेविड फ्रिथ (David Frith) हे त्तकालिन विजडन क्रिकेट मासिकाचे संपादक होते. "टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची पात्रता नाही. तसंच टीम इंडिया विश्वविजेता ठरली, तर मी माझे शब्द खाईन", अशा आशयाचं पत्र डेविड फ्रिथ पत्रकाराने टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला लिहिलं होतं.
मात्र टीम इंडियाने फ्रिथची भविष्यवाणी खोटी ठरवली. एखाद्या व्यक्तीला किंवा टीमला कमकुवत समजणं किंवा एखाद्याच्या क्षमतेबाबत शंका उपस्थित केल्यावर काय होतं, या पत्रकाराला चांगलंच लक्षात आलं.
टीम इंडियाचा इतिहास आहे, नडला की 'ठोकला'. अखेर पत्रकाराला त्याचा शहाणपणा नडलाच. टीम इंडियाने या पत्रकाराला तोंडाने उत्तर न देता आपल्या कामगिरीने उत्तर देत त्याचं थोबाड बंद केलं.
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. संपूर्ण क्रिकेट विश्वातून टीम इंडियावर कौतुकांचा वर्षाव सुरु होता. तर दुसऱ्या बाजूला हा पत्रकार तोंडघशी पडला होता. आपण जे काही म्ंहटलंय, ते आता पूर्ण करावं लागेल, हे चिंता त्या पत्रकाराला खात होती.
आता पत्र लिहिण्याची वेळ होती मान सिंह यांची. मान सिंह यांनी विज्डन मासिकाला पत्र लिहिलं. डेविड फ्रिथन यांनी जे कबूल केलं होतं त्याची आठवण मान सिंह यांनी या पत्राद्वारे त्यांना करुन दिली.
तुम्ही तुमचा शब्द कधी पूर्ण करणार, असं या पत्रातून त्यांना विचारणा करण्यात आली. तसेच मान सिंह यांनी डेविड फ्रिथ यांना पेपरसोबत थंड किंवा गरम द्रव पदार्थ खाण्याचा पर्यायही दिला. या पत्रानंतर पत्रकाराने आपला शब्द पाळला. त्यावेळी त्यांचा पेपर खातानाचा फोटोही वृत्तपत्रात झळकला.
डेविड फ्रिथ यांचा चेहरा पूर्णपणे पडला होता. आपण जे काही म्हंटलं होतं, त्यांची त्यांना आता लाज वाटत होती. सप्टेंबर 1983 मध्ये दैनिकात मान सिंह यांनी लिहिलेल्या पत्राच्या फोटोसह फ्रिथ यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला.
प्रसिद्ध झालेल्या या फोटोत फ्रिथ यांच्या तोंडात कागदाचा तुकडा होता. "भारताने मला माझे शब्द खाण्यास भाग पाडलं", असं या वृत्ताचं मथळा होता. विजडनने प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये चॉकलेटसह कागदाचे तुकडे खाताना दिसत आहेत.