भारतात ४ देशांची 'सुपर सीरिज', सौरव गांगुलीची घोषणा

भारतामध्ये लवकरच ४ देशांची सुपर सीरिज होणार असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनी केली आहे.

Updated: Dec 23, 2019, 08:18 PM IST
भारतात ४ देशांची 'सुपर सीरिज', सौरव गांगुलीची घोषणा title=

मुंबई : भारतामध्ये लवकरच ४ देशांची सुपर सीरिज होणार असल्याची घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनी केली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आणखी एक टीम या सुपर सीरिजमध्ये सहभागी होईल. २०२१ साली ही सुपर सीरिज खेळवली जाईल, असं गांगुलीने सांगितलं. २०२१ मध्ये ही सुपर सीरिज खेळवली गेली, तर ५ वर्ष क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा खेळवल्या जातील.

२०१९ साली ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर आता २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २०२१ साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल इंग्लंडमध्ये होणार आहे. यानंतर २०२३ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप भारतात होणार आहे.

आयसीसीने २०२३ ते २०३१ पर्यंत प्रत्येक वर्षी आयसीसीची स्पर्धा घ्यायचा प्रस्ताव ठेवला होता, पण भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने याला विरोध केला होता. त्यानंतर आता या सुपर सीरिजचं आयोजन होणार आहे.

४ देशांच्या सुपर सीरिजसाठी इंग्लंड बोर्डाशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती गांगुलीने दिली. २०२१ साली सुपर सीरिजच्या पहिल्या पर्वाचं आयोजन भारतात होईल, असं गांगुलीने सांगितलं. म्हणजेच ४ देशांची ही सुपर सीरिज भविष्यात दुसऱ्या देशांमध्ये होणार असल्याचे संकेतही गांगुलीने दिले. 

आयसीसीच्या नियमांनुसार ३ देशांपेक्षा जास्त टीम एका सीरिजमध्ये खेळू शकत नाहीत, त्यामुळे आता आयसीसी यावर काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.