Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येते. शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीया हा शुभ सण असणार आहे. या सणाला पितरांचा सणही असं म्हणतात. मराठावाडा, विदर्भात अक्षय्य तृतीयेला पूर्वज आणि पितरांना पान दाखवण्याची परंपरा आहे. शास्त्रात असं म्हणतात की, अक्षय्य तृतीया हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. यादिवशी शुभ कार्य केलं जातं आणि त्या कामाला अक्षय प्राप्त होतं असं म्हणतात. मग अक्षय्य तृतीयेला पितरांची पूजा का केली जाते. (Why do ancestors worship on the auspicious day of Akshaya Tritiya Chinchoni has a special significance)
अक्षय म्हणजे अविनाशी याचा अर्थ या दिवशी होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप केल्यास जे पूर्ण मिळतं ते अक्षय राहतं. शास्त्रानुसार ही शुभ तिथी आहे तसंच ती पुण्यतिथीदेखील मानली जाते. त्यामुळे या दिवशी श्राद्ध दिवस मानला जातो आणि यादिवशी पितरांची पूजा केली जाते. गृहस्थ सपत्नीक पितृत्रयी म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा तर मातृत्रयी म्हणजे आई, वडिलांची आई, वडिलांची आजी त्यासोबत मातामहत्रयी आईची आई, आजी, पणजी यांच्यासाठी पिंडरहित श्राद्ध करण्याची परंपरा आहे.
पूजा साहित्य
पत्रावळी, तांदुळ, मृत्तिकाघट म्हणजे पाण्याने भरलेला मातीचा घट, गंध, फुलं, तीळ, सुपारी, विड्याची पानं, दक्षिणा, सूत्र, धूप, दीप, पळ, पैसे, अक्षता.
अक्षय्य तृतीयेला दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवावं. या दिवशी पितरांना उदककुंभ दान करतात. म्हणजे पत्रावळी वेष्टन करावं. त्या घटाला गंध लावावं आणि फुलं, तीळ, सुपारी, विड्याची पानं, दक्षिणा, वाळा आणि पाणी घालावं. घटाची पंचोपचार पूजा करुन तो ब्राह्मणास दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करुन पितृस्तोत्र हात जोडून म्हणावं. तसंच या दिवशी केळीचं पूजनही काही ठिकाणी केलं जातं.
अक्षय्य तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस असतो. या दिवशी खास पितरांचं नैवेद्यचं पान हे पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर आणि द्रोण असतो. या खास पानावर खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, आंबाचा रस, पापड, कुरडया इत्यादी तयार केला जातो. त्यातील चिंचोणीला अतिशय महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, पूर्वीच्या काळात जुन्या काळात आजी आणि आई चिंचोणी बनवायच्या या कर किंवा मातीच्या घागरमध्ये ठेवायच्या. त्या चिंचोणीला मातीचा सुगंध लागतो. तो पदार्थ या करमध्ये आठ ते दहा दिवस टिकतो. ही प्रथा पूर्वी केली जायची. आज पूर्वजांच्या स्मरणात अक्षय्य तृतीयेला चिंचोणी करण्याची परंपरा आहे.
गुळ, चिंच, विड्याची पाने, काथ, चुना, चिकन सुपारी, विलायची, वाळा, भिजवलेले तांदुळ, खोबरा खिस, चिंचेचा कोळ, तुप, लवंग, खसखस, मीठ.
आता चिंच नीट साफ करून ते पाण्यात भिजवून ठेवा. आता मिक्सच्या भांड्यात विड्याची पाने, काथ, चुना, चिकन सुपारी, विलायची, भिजवलेले तांदुळ फिरवून पावडर करा. आता चिंचेचा कोळ एका भांड्यात गॅसवर चांगला उकळू द्या. आता त्यात गूळ, पावडर, खसखस, तुप, खोबरा खिस आणि चवीनुसार मीठ घाला.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)